बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील जीवन विस्कळीत, विमानसेवाही प्रभावित

ऐन हिवाळ्यातील चिल्लाई कलान या ४० दिवसांच्या काळात काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली नाही.
बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील जीवन विस्कळीत, विमानसेवाही प्रभावित

श्रीनगर : ऐन हिवाळ्यातील चिल्लाई कलान या ४० दिवसांच्या काळात काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली नाही. यामुळे चिंता शिगेला पोहोचली असतानाच मागील आठवड्याच्या उत्तरार्धात तेथे बर्फवृष्टी सुरू झाल्याने नागरिकांना उकाडा आणि पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला होता. मात्र आता अति बर्फवृष्टीमुळे तेथे वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. रविवारी श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

शनिवारी रात्री सुरू झालेली बर्फवृष्टी सकाळी थांबली होती. त्यानंतर रनवे स्वच्छ करण्यात आला होता. मात्र काही वेळाने पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाल्याने उड्डाणे बंद करावी लागली. यात इंडिगो कंपनीच्या सहा उड्डाणांचा समावेश आहे. या सहा उड्डाणांपैकी चार श्रीनगरहून होती, तर दोन लेहहून होती. मात्र खराब हवामानामुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. श्रीनगर आणि लेह दोन्ही विमानतळांवरील रनवे बंद करण्यात आले आहेत. काश्मीरच्या मैदानी भागात देखील मध्यम प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. स्नो हटवून मार्ग मोकळे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने रस्त्यांवरून वाहने सावकाश आणि काळजीपूर्वक हाकण्याची सूचना देखील केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in