लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे निव्वळ टाईमपास -अलाहाबाद उच्च न्यायालय

आयुष्य म्हणजे फुलांची मखमली चादर समजण्याची चूक तरुणांनी करू नये
लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे निव्वळ टाईमपास -अलाहाबाद उच्च न्यायालय
Published on

अलाहाबाद : सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली असली तरीही अशी नाती प्रामाणिकपणापेक्षाही एकमेकांच्या आकर्षणातून तयार होतात. तसेच अशी नाती अत्यंत नाजूक आणि अस्थिरही असतात. असे म्हणत उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे निव्वळ टार्इमपास अशा शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

एका आंतरधर्मीय जोडप्याने पोलीस संरक्षण मागितले होते. ती याचिका फेटाळून लावत लिव्ह इन रिलेशनशिप हे एक अस्थिर आणि टाईमपास नाते आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आयुष्यात समस्या आणि संघर्ष येतात. त्यामुळे आयुष्य म्हणजे फुलांची मखमली चादर समजण्याची चूक तरुणांनी करू नये, असा सल्ला देखील न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती मोहम्मद अजहर हुसैन इदरीसी यांच्या खंडपीठाने सांगितले की, दोन महिन्यांच्या ओळखीतून २०-२२ वर्षांचे तरुण अशा अस्थिर नात्यांविषयी विचार करू शकतात, असे न्यायालय ग्राह्य धरू शकत नाही. आयुष्यात समस्या आणि संघर्ष येतात. त्यामुळे याला फुलांची मखमली चादर समजण्याची चूक तरुणांनी करू नये.

याबाबतचा मूळ प्रकरण असे की, उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रिफायनरी ठाणे क्षेत्रातील २२ वर्षांची एक हिंदू मुलगी घर सोडून मुस्लीम समाजातील तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायला लागली. याप्रकरणी तरुणीच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मुस्लीम तरुणाने आमच्या मुलीला पळवले आहे, अशी तक्रार तरुणीच्या आई-वडिलांनी केली. त्यामुळे ही तक्रार रद्द करण्याच्या उद्देशाने हे जोडपे अलाहाबाद हायकोर्टात पोहोचले. माझ्या कुटुंबापासून आमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांच्यापासून आम्हाला पोलीस संरक्षण हवे, असे तरुणीने तिच्या याचिकेत म्हटले. तसेच, तरुणी सज्ञान असून ती तिच्या जोडीदाराच्या निवडीबाबत निर्णय घेऊ शकते, असे तरुणीच्या वकिलाने कोर्टात सांगितले. परंतु, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in