चंदिगड : महाराष्ट्र, कर्नाटकनंतर आता पंजाबमध्येही परप्रांतीयांविरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील काही काळापासून मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांनी पंजाबमध्ये स्थलांतर केले. त्यातील काहींनी इथल्या संस्कृती, पंजाबी भाषा आणि शीख धर्माच्या प्रथा परंपरेशी जुळवून घेतले. परंतु आता या राज्यात उत्तर प्रदेश, बिहारीविरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उठविला आहे. पंजाबमधील वाढत्या गुन्हेगारीमागे स्थलांतरितांचा हात असल्याचे सांगत येथील लोकांनी परप्रांतामधील लोक पंजाबमधील वातावरण खराब करीत असल्याचा आरोप केला आहे.
अलीकडेच ९ सप्टेंबर रोजी होशियारपूर येथे ५ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपी परप्रांतीय होता. त्यानंतर पंजाबमध्ये परप्रांतीयांविरोधात आक्रोश दिसून येत आहे. उत्तर प्रदेश-बिहारमधील लोकांना राज्यातून बाहेर काढा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंजाबच्या अनेक गावांत ग्रामपंचायतीने प्रस्ताव पारित करून यूपी-बिहारींना भाड्याने घरे देऊ नका, असे म्हटले आहे. त्याशिवाय या नागरिकांना रेशन कार्ड, मतदार कार्डही बनवून देऊ नये, अशी मागणी केली आहे. होशियारपूरच्या या घटनेनंतर पंजाबच्या अनेक शहरांमध्ये यूपी-बिहारींना हाकला, पंजाबला वाचवा, असा नारा घुमू लागला आहे.
स्थलांतरितांची गर्दी
गरुद्वारामध्यही परप्रांतीयांविरोधात आवाहन केले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यूपी-बिहारी लोक पुन्हा त्यांच्या राज्यात परतत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड येथे स्थलांतरितांनी गर्दी केली आहे. पंजाबमध्ये यूपी-बिहारींना मदत करणाऱ्यांवरही बहिष्कार टाकला जाईल, अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. पंजाबच्या गल्ली गल्लीमध्ये रिक्षामधून स्पीकरद्वारे लोकांना यूपी-बिहारीविरोधात आवाहन केले जात आहे. या लोकांना कुणी काम देऊ नका, भाड्याने घर देऊ नका, अशी मोहीमच सुरू करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर अभियान
सध्या पंजाबच्या सर्व सोशल मीडियात यूपी-बिहारी यांच्याविरोधात मोहीम सुरू आहे. त्यात या लोकांना भाड्याने घरे देऊ नका, असे आवाहन केले जात आहे. त्याशिवाय या लोकांना जमिनी विकू नका, त्यांना इथली ओळखपत्रे देऊ नका, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.