काँग्रेसचे लक्ष केवळ दलालीवर; मोदींचा आरोप

जेव्हा त्यांच्या हाती सत्ता होती तेव्हा त्यांनी तेच केले आणि आताही त्यांचा तोच हेतू आहे. लोक आता त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे मोदी यांनी यावेळी म्हटले. काँग्रेसला अनेक मतदारसंघात उमेदवार मिळत नाहीत.
काँग्रेसचे लक्ष केवळ दलालीवर; मोदींचा आरोप
Published on

सहारनपूर : भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) उच्च ध्येयाने प्रेरित होऊन एका ‘मिशन’साठी काम करत आहे, तर काँग्रेसप्रणीत आघाडीचे लक्ष केवळ ‘कमिशन’ (दलाली) मिळवण्यावर आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे शनिवारी निवडणूक प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी केवळ भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागा मिळू न देणे यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस म्हणजे अस्थैर्य आणि अनिश्चितता असे समीकरण बनले आहे. त्यांचा हेतू केवळ दलाली मिळवणे इतकाच आहे. जेव्हा त्यांच्या हाती सत्ता होती तेव्हा त्यांनी तेच केले आणि आताही त्यांचा तोच हेतू आहे. लोक आता त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, असे मोदी यांनी यावेळी म्हटले. काँग्रेसला अनेक मतदारसंघात उमेदवार मिळत नाहीत.

समाजवादी पक्ष तर दर तासाला उमेदवार बदलत आहे, अशी टीकाही केली. काँग्रेसने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव जाणवत आहे. पक्षावर डाव्या विचारांच्या पक्षांचा पगडा आहे, असेही मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in