निवडणूक आयोगाचा बडगा; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नड्डा, खर्गे, राहुल यांना नोटीस

निवडणूक आयोगाचा बडगा; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नड्डा, खर्गे, राहुल यांना नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बांसवारा येथे समाजात फूट पाडणारे भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बांसवारा येथे समाजात फूट पाडणारे भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे नोटिसा बजावल्या आहेत.

बांसवारा येथे मोदी यांनी २१ एप्रिल रोजी केलेल्या भाषणाबद्दल काँग्रेस, भाकप, भाकप (एमएल) आदींनी केलेल्या तक्रारींवरून निवडणूक आयोगाने नड्डा यांना नोटीस पाठविली असून त्यासंदर्भात सोमवारपर्यंत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना भाजपच्या सर्व स्टार प्रचारकांच्या निदर्शनास आणून द्याव्या, असे निवडणूक आयोगाने नड्डा यांना सांगितले आहे. उच्च पदावरील व्यक्तींनी केलेल्या भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होत असतात, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने भाजपने केलेल्या आरोपांबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वतंत्र नोटिसा पाठविल्या आहेत.

मंगळसूत्र वक्तव्य अंगलट

जनतेच्या संपत्तीचे काँग्रेसला फेरवाटप करावयाचे असून त्या पक्षाला महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रही काढून घ्यावयाचे आहे, असे वक्तव्य मोदी यांनी राजस्थानच्या सभेत केले होते. त्यासंदर्भात विरोधी पक्षांनी तक्रारी केल्या होत्या. या वक्तव्यावरून राजकीय रण पेटले, मोदी खोटा दावा करीत असल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य पक्षांनी केला, तर काँग्रेस मुस्लिमांचे लांगूलचालन करीत असल्याचा आरोप भाजपने केला.

पंतप्रधानांविरुद्धच्या तक्रारीची आयोगाने प्रथमच घेतली दखल

मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केली होती. त्याची निवडणूक आयोगाने दखल घेऊन भाजप अध्यक्ष नड्डा यांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांविरुद्धच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मोदी यांना ‘क्लीनचिट’ दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in