Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू

राज्यातील ८ मतदारसंघात जवळपास १६ हजार ५८९ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. या आठही मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या लक्षणीय असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू

मुंबई : देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. देशातील १३ राज्यात ८८ जागांवर आज (२६ एप्रिल) सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ मतदारसंघाचा देखील समावेश आहेत.

या निवडणुकीत महाराष्ट्र - ८, उत्तर प्रदेश - ८, राजस्थान - १३, मध्य प्रदेश - ७, आसाम - ५, बिहार - ५, कर्नाटक - १४, छत्तीसगड - ३, पश्चिम बंगाल - ३, मणिपूर - १, त्रिपुरा - १, जम्मू-काश्मीर - १ आणि केरळमध्ये सर्व २० जागांवर मतदान सुरू झाले आहे. या १३ राज्यात एकूण १२०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच राज्यात अमरावतीमधून सर्वाधिक म्हणजे ३७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापाठोपाठ परभणी - ३४, हिंगोली -३३, वर्धा -२४, नांदेड - २३, बुलढाणा - २१, यवतमाळ-वाशीम - १७ आणि अकोला - १५ इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

'या' प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात मतदान

या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात आज सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर मथुरेतून हेमा मालिनी, कोटा बूंदीतून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, बंगळुरूमधून भाजपचे तेजस्वी सूर्या, तिरुवनंतपुरममधून शशी थरूर आणि राजनांदगांवमधून भूपेश बघेल या नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था

राज्यातील ८ मतदारसंघात जवळपास १६ हजार ५८९ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. या आठही मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या लक्षणीय असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परभणीत सर्वाधिक ४२ तर त्या खालोखाल नांदेडमध्ये ३१ मतदानकेंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रांच्या बाहेर विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अकोल्यात होणार तिरंगी लढत

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे आणखी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपला होत असल्याच्या चर्चा गेल्या सुरू आहेत. त्यामुळे गेल्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होईल, अशी शक्यता नकारता येत नाही. पण, अकोल्याचे मतदार वेगळा कौल देऊन परिस्थितीत बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in