लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदान नोंदवण्यात आले, तर हिंगोलीत सर्वात कमी ५२.०३ टक्के मतदान झाले.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांत ८९ लोकसभा मतदारसंघांत सरासरी ६०.९६ टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान त्रिपुरात ७६.२३ टक्के, तर सर्वात कमी उत्तर प्रदेशात ५२.६४ टक्के झाले

मणिपूरमध्ये ७६.०६ टक्के, छत्तीसगडमध्ये ७२.१३ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७१.८४ टक्के, आसाममध्ये ७०.६६ टक्के, जम्मू व काश्मीरमध्ये ६७.२२ टक्के, केरळमध्ये ६३.९७ टक्के, कर्नाटकात ६३.९० टक्के, राजस्थानात ५९.१९ टक्के, मध्य प्रदेशात ५४.८३ टक्के, महाराष्ट्रात ५३.५१ टक्के आणि बिहारमध्ये ५३.०३ टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात वर्धा येथे ५६.६६ टक्के, अकोला ५२.४९ टक्के, अमरावती ५४.५० टक्के, बुलढाणा ५२.२४ टक्के, हिंगोली ५२.०३ टक्के, नांदेड ५२.४७ टक्के, परभणी ५३.७९ टक्के, यवतमाळ- वाशिम ५४.०४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील आठ जागांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यात या टप्प्यात २०४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

केरळात २० जागांवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यातील काही मतदान केंद्रांवर बनावट मतदान झाल्याच्या आणि ईव्हीएम खराब झाल्याच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. पलक्कड, अलाप्पुझा व मलप्पुरम येथे मतदान केल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कोझिकोड येथे एका मतदान केंद्रावर पोलिंग एजंटचा मृत्यू झाला.

बिहारच्या किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर व बांका मतदारसंघात शांततापूर्ण मतदान झाले. या पाच जागांवर ५० उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.

उत्तर प्रदेशात आठ जागांवर मतदान झाले. अमरोहा, मेरठ, बागपत, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, बुलंदशहर, अलीगढ़ आणि मथुरा आदी जागांवर मतदान झाले. या मतदारसंघात ९१ उमेदवार रिंगणात आहेत.

राजस्थानच्या बाडमेर, जोधपूर, जालौर, बांसवाड़ा, चित्तौड़गढ़, कोटा, टोंक-सवाई माधोपूर, अजमेर, पाली, उदयपूर, राजसमंद व झालावाड़-बारां आदी १३ मतदारसंघांत निवडणूक झाली. तेथे १५२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, बालुरघाट आणि रायगंज या मतदारसंघात मतदान झाले. कर्नाटकच्या १४ लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले. छत्तीसगडच्या तीन लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले. तेथे ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर आसामच्या पाच जागांवर मतदान झाले असून, तेथे ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मध्य प्रदेशच्या सहा लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले, तर त्रिपुरा पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. येथे ६९.४८ टक्के मतदान झाले. आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. तसेच जम्मू-काश्मीरमधील जम्मू लोकसभा मतदारसंघात सरासरी ६७ टक्के मतदान झाले.

वर्ध्यात सर्वाधिक, तर हिंगोलीत कमी मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदान नोंदवण्यात आले, तर हिंगोलीत सर्वात कमी ५२.०३ टक्के मतदान झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in