बंगालमध्ये पूर्वाश्रमीचे पती-पत्नी आमनेसामने; बिष्णुपुरात होणार चुरशीची लढत

तृणमूल काँग्रेसकडून सुजाता मोंडल या निवडणूक लढतील तर भाजपकडून सौमित्र खान हे त्यांचे पूर्वाश्रमीचे पती निवडणूक लढतील.
बंगालमध्ये पूर्वाश्रमीचे पती-पत्नी आमनेसामने;  बिष्णुपुरात होणार चुरशीची लढत
(छायाचित्र सौजन्य- X @AmeetKush)

बिष्णुपूर : पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्वाश्रमीचे पती-पत्नी परस्परांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तृणमूल काँग्रेसकडून सुजाता मोंडल या निवडणूक लढतील तर भाजपकडून सौमित्र खान हे त्यांचे पूर्वाश्रमीचे पती निवडणूक लढतील.

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मोंडल यांनी सांगितले की, हा अन्यायाविरुद्धचा लढा आहे आणि बिष्णुपूरचे मतदार त्यांच्या मुलीला निवडतील, अशी आशा मला आहे. ही अन्यायाविरुद्धची लढाई आहे. मी माझा सर्व काळ बिष्णुपूरमध्ये व्यतित केला आहे. मी बिष्णुपूरची मुलगी आहे.

२०१६ मध्ये सौमित्र आणि सुजाताचे लग्न झाले होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकांवेळी मोंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला.

खान यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली आणि २०११ च्या निवडणुकीत ते कतुलपूरमधून पश्चिम बंगाल विधानसभेवर निवडून आले. २०१३ मध्ये, ते TMC मध्ये गेले आणि २०१४ मध्ये बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून सुमारे १.२० लाख मतांच्या फरकाने निवडून आले. त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या खान यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने या महिन्याच्या सुरुवातीला या जागेसाठी खान यांची उमेदवारी जाहीर केली. ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने राज्यातील सर्व ४२ लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in