लोकसभेच्या निवडणुका एप्रिलमध्ये? निवडणूक आयोगाची मात्र सारवासारव

निवडणुकीच्या कामासाठी ‘फक्त संदर्भ म्हणून’ ही तारीख नोंद केल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले. त्यामुळे १६ एप्रिलपासून निवडणूक होणार या चर्चेला सध्यातरी ब्रेक लागला आहे.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिलमध्ये? निवडणूक आयोगाची मात्र सारवासारव

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. विविध ठिकाणी सभा, रॅलीचे आयोजन केले जात असतानाच लोकसभेच्या निवडणुकीची तारीख १६ एप्रिल ठरल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात जोरदार चर्चेला ऊत आला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने स्पष्टीकरण दिले. निवडणुकीच्या कामासाठी ‘फक्त संदर्भ म्हणून’ ही तारीख नोंद केल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले. त्यामुळे १६ एप्रिलपासून निवडणूक होणार या चर्चेला सध्यातरी ब्रेक लागला आहे.

निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने १६ एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचे सांगण्यात आले. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्या माध्यमातून १६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस १६ एप्रिल २०२४ घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व ११ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी केली होती. त्यावर 'भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालनपालन' असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात एक्सवर पोस्ट केले आणि ती तारीख केवळ संदर्भासाठी होती.

सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारणार

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जाता येईल. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील ३६ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in