जम्मू-काश्मिरात अब्दुल्ला, मुफ्ती यांना झटका

आज पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मिरात मंगळवारी झालेल्या मतमोजणीत राज्यातील दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे.
जम्मू-काश्मिरात अब्दुल्ला, मुफ्ती यांना झटका

श्रीनगर : २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवले होते. त्यानंतर राज्यात विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक झाली नव्हती. त्यावेळी राज्यात केंद्रशासित राजवट लागू झाली आहे. आज पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मिरात मंगळवारी झालेल्या मतमोजणीत राज्यातील दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात पीडीपीच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना मोठा झटका बसला आहे. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

बारामुल्लाच्या जागेवर अपक्ष उमेदवार अब्दुल रशीद शेख यांनी विजय मिळवला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयाची आशा असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी आपला पराभव स्वीकारला असून अब्दुल शेख यांना विजयाच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत.

भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर मतदारसंघातून सुमारे ५९ हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर जम्मूचे विद्यमान खासदार जुगल किशोर शर्मा १०३,१३६ मतांनी आघाडीवर होते.

काश्मीरमधील लोकसभेच्या तीन जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. १९८९ मध्ये जम्मू-काश्मिरात दहशतवादाने उच्छाद मांडला होता. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान होत नव्हते. २०२४ मध्ये मतदानाने यंदा विक्रम मोडला. काश्मीरमधील लोकसभेच्या तीन जागांसाठी मंगळवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग-राजौरी या तीन मतदारसंघांसाठी स्थापन करण्यात आलेल्या चार मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

अल्ताफ बुखारी यांनी अनंतनाग-राजोरी आणि श्रीनगर या जागांवर आपल्या उमेदवारांचा पराभव स्वीकारला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘जम्मू-काश्मीरच्या लोकांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे आणि त्यांचा निर्णय स्पष्ट आहे. आम्ही नम्रतेने आणि सभ्यतेने निवडणूक निकाल स्वीकारतो. घराणेशाहीचे राजकारण नाकारणे आणि जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा (ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती) पराभव हा एक मजबूत संदेश आहे आणि आम्ही बदलाची इच्छा स्वीकारतो. विजयी उमेदवारांचे यशाबद्दल अभिनंदन. आम्ही या संधीचा उपयोग आत्मपरीक्षण करण्यासाठी, आमच्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि अधिक मजबूत आणि अधिक लवचिक होण्यासाठी करू. आम्ही लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या इच्छेचा आदर करतो आणि आम्ही नवीन सुरुवातीची वाट पाहतो. हा नवा अध्याय जम्मू-काश्मीरमध्ये समृद्धी, शांतता आणि प्रगती घेऊन येवो, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in