Loksabha : भर लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपसह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही सुनावले; म्हणाल्या...

संसदेच्या अधिवेशनाचा (Loksabha) पहिला दिवस हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे चांगलाच गाजला. दोन्ही राज्यांच्या खासदारांमध्ये यावेळी खडाजंगी पाहायला मिळाली
Loksabha : भर लोकसभेत खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपसह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही सुनावले; म्हणाल्या...

आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Loksabha) सुरूवात झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरु असताना याचे पडसाद संसदेतदेखील पहिल्याच दिवशी दिसून आले. यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या खासदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या मुद्द्यावरून भाजपसह कर्नाटक सरकारवर टीका केली. यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनाही या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. "गेले काही दिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्राविरोधात काहीही बोलत आहेत. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत, हे चालणार नाही," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जाणूनबुजून पेटवला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात काहीही वायफळ बोलत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. तरीही या हल्ल्यामागे असलेल्या एकावरही अद्याप कर्नाटक सरकारने कारवाई केलेली नाही. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलत सुटले आहेत."

दरम्यान, महाराष्ट्राचा मुद्दा मांडताच सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. यावेळी कर्नाटकच्या खासदारांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, ठाकरे गटाचे खासदारही आक्रमक झाले आणि कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तर, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही दादागिरीची आहे. महाराष्ट्र ते सहन करणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटक सरकारने उगीचच वाद उकरून काढला. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार केला जातो. महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली जाते, आम्ही याचा धिक्कार करतो."

"दोन राज्यांच्या वादामध्ये केंद्र काय करणार?"

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर राज्यसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दोन्ही राज्याच्या खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, "हा वाद दोन राज्यांमधील असून ही संसद आहे. या वादात केंद्र सरकार काय करणार? दोन्ही राज्यांकरिता हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्यावर सविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे. आताच चर्चा करणे शक्य नाही."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in