दुमका : संथल परगणामधील आदिवासींची लोकसंख्या घुसखोरीमुळे घटत चालली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केला. झारखंडमधील जेएमएमच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी घुसखोरांना आश्रय देत असून हे घुसखोर जमिनी बळकावून महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करीत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला आणि लव्ह जिहादची सुरुवात झारखंडमधूनच झाल्याचा दावाही त्यांनी केला.
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर लूट चालविली असून ४ जूननंतर देशात भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, झारखंडवर मोठे संकट घोंघावत असून ते म्हणजे घुसखोरी आहे. संथल परगणासमोर घुसखोरीचे आव्हान आहे. अनेक ठिकाणी आदिवासांची लोकसंख्या घटत आहे आणि घुसखोरांची संख्या वाढत आहे. घुसखोर आदिवासींच्या जमिनी बळकावत आहेत. आदिवासी कन्या हे घुसखोरांचे लक्ष्य आहे. त्यांची सुरक्षा, जीवन धोक्यात आहे, असे मोदी म्हणाले.
मोदींनी २०२२ मधील प्रसंगाची आठवण यावेळी करून दिली. आदिवासी मुलीच्या देहाचे ५० तुकडे केले जातात, त्यांना जिवंत जाळले जाते, काहींच्या जिभा कापल्या जातात, हे लोक कोण आहेत, आदिवासींच्या मुलींना कोण लक्ष्य करीत आहे, जेएमएम सरकार त्यांना का आश्रय देत आहे, लव्ह जिहादची सुरुवात झारखंडमधूनच झाली, असा दावा मोदी यांनी केला.
जेएमएम जातीय राजकारण करीत आहे. ब्रिटिशांच्या काळापासून रविवारी सुटी दिली जाते. असे असताना झारखंडच्या एका जिल्ह्यात मात्र सुटी शुक्रवारी दिली जाते, असे पंतप्रधान म्हणाले.