

नवी दिल्ली: मध्य-पूर्वेतील युद्धाचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवत असल्याने आता त्याची झळ थेट देशवासीयांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत, तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११५-रुपयांनी वाढ झाली आहे. नवे दर शनिवारपासून लागू झाले आहेत.
वितरण सुरळीत ठेवण्यासाठी गॅस कंपन्या आणि डीलर्स यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकीत ग्राहकांना त्रास होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचा योग्य वापर व्हावा यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांमुळे वितरण पद्धतीत काही बदल होणार असल्याचेही समोर येत आहे. संभाव्य गॅस टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतामधील ऊर्जासाठ्याची स्थिती सुधारत आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणर नाहीत, अशी ग्वाही सरकारी सूत्रांनी पुन्हा एकदा दिली. भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीव्यतिरिक्त अन्य स्रोतांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये १० टक्क्यांनी वाढ केली आहे. यापूर्वी कच्च्या तेलाची आयात ६० टक्के होती, ती आता ७० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असे वृत्त सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात आयात होणारा एलपीजी गॅस पुरवठा खंडित झाला. इराणकडून बंद करण्यात आलेल्या समुद्री मार्गाहूनच भारताला एलपीजीचा पुरवठा होतो. मात्र, तो मार्ग बंद असल्याने पुरवठा थांबला. इतकेच नव्हे तर यादरम्यान इराणकडून गॅसच्या प्रकल्पांवरही हल्ला करण्यात आला. ज्यामुळे अनेक देशांनी काही दिवसांकरिता प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक गॅस प्लांटमधून नव्या ऑर्डर स्वीकारणे बंद केले असून, दोन दिवसांत व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, आता या युद्धाचा थेट परिणाम भारतीय लोकांवरही होताना दिसत आहे.
खासगी कंपन्यांचे वितरण थांबले
दरम्यान, काही खासगी गॅस कंपन्यांचे वितरण सध्या थांबवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 'टोरंटो गॅस', 'रिलायन्स गॅस', 'महेश गॅस' आणि 'गो गॅस' या कंपन्यांकडून होणारे वितरण सध्या बंद ठेवण्यात आले आहे. यासोबतच ग्राहकांनी घाबरून गॅस सिलिंडरचा अतिरिक्त साठा करू नये, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.