

नवी दिल्ली: भारतात घरगुती ग्राहकांना सध्या १०० टक्के एलपीजीचा पुरवठा होत असला तरी परिस्थिती चिंताजनक आहे. घाबरून केलेले बुकिंग कमी झाले आहे, परंतु लोकांनी अफवांकडे दुर्लक्ष करत गरज असेल तरच सिलिंडरचे बुकिंग करावे, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी केले आहे. एलपीजीची परिस्थिती गंभीर असून पुरवठा कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जनतेने त्यांच्या परीने इंधनाचा पर्यायी मार्ग शोधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
इस्त्रायल-इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध वीस दिवसांपासून सुरू आहे. पश्चिम आशियातील हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकाबंदी केली आहे. कच्चे तेल आणि गॅस वाहून नेणाऱ्या जहाजांना तेथून जाण्यास इराणने परवानगी नाकारली आहे. या कारवाईमुळे भारतासह जगभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पंतप्रधानांची ओमान, कतारसह जागतिक नेत्यांशी चर्चा
सरकारने एलपीजीचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. सध्या घरगुती गॅसचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे एलपीजीच्या आयातावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान राकेश सिन्हा यांनी सांगितले की, आखाती देशात भारताची २२ जहाजे आणि त्यावरील खलाशी सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी ओमान आणि कतारसह अनेक आखाती देशांशी आणि फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह जागतिक नेत्यांशी चर्चा केली व राजनैतिक तोडगा काढण्याच्या गरजेवर भर दिला.
साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकाबंदी केल्याने भारतात एलपीजीची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी एलपीजीच्या परिस्थितीबाबत मोठे विधान केले आहे. जनतेने पर्यायी इंधनाचा विचार करावा. त्यांनी घाबरून खरेदी करणे टाळावे, असे आवाहन सुजाता शर्मा यांनी केले आहे. सरकार काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यात ४५०० पेक्षा जास्त छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.