लखनौ : गेल्या काही दिवसांत एसी बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. लखनौत आग्रा एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या एका एसी बसचा टायर अचानक फुटला आणि त्यामुळे बसला भीषण आग लागली. काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० प्रवासी होते. सुदैवाने ते सर्व जण थोडक्यात बचावले.
आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दोन किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होते. प्रवाशांनी आणि इतर लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग काही केल्या शांत झाली नाही. अखेर अग्निशमन दल सुमारे एक तासानंतर घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांनी आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत बस आगीच्या पूर्णत: भक्ष्यस्थानी पडली होती.
रविवारी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास काकोरी पोलीस स्टेशन परिसरातील एक्सप्रेस वेवरील टोल प्लाझाजवळ हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून गोंडाला जात होती. छठ सणामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होती.
प्रवाशांनी सांगितले की, बस एक्स्प्रेस वेवर ताशी ८०-९० किमी वेगाने जात असताना अचानक मागचा टायर फुटला. मोठा आवाज झाला आणि बस हलली. चालकाने ताबडतोब ब्रेक लावले. मागून धूर येऊ लागल्यावर तो परिस्थिती तपासण्यासाठी खाली उतरला. धूर निघताना पाहून चालक आणि क्लीनर घाबरले. त्यांनी प्रवाशांना बाहेर येण्यास सांगितले. सकाळची वेळ होती, त्यामुळे बहुतेक प्रवासी झोपले होते. अनेकांनी आपले सामान बसमध्ये सोडून बाहेर पळ काढला. तोपर्यंत धुराचे आगीत रूपांतर झाले होते.