

लखनऊ : उत्तर प्रदेशातील अलिगंजमधील पुरानिया परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते. हाती आलेल्या माहितीनुसार या आगीत १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फोनवरून बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, लखनौमधील आगीत एकूण १५मुलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे १० गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचा वापर केला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीची मागील बाजूची भिंत तोडली.
याप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा
या दुर्घटनेचे बचावकार्य पूर्ण झाले असून, राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे, असे उपमुख्यमंत्री पाठक यांनी सांगितले. तसेच घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही आणि कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते लवकरच घटनास्थळी पोहोचतील.
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दुःख
लखनौमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना ५०हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ॲनिमेशन केंद्रात अचानक लागली आग
एक ॲनिमेशन केंद्रात ही आग अचानक लागली. येथे मुले ॲनिमेशन, म्हणजेच कार्टून बनविण्याचे शिक्षण घेत होती. ही घटना नेमकी कशी झाली, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती प्राप्त झालेली नाही. जखमींना केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधान सचिव (गृह) आणि डीजीपी यांना घटनास्थळी बोलावून, घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.