
नवी दिल्ली : रविवारी रात्री १० वाजल्यापासून वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सुरू झाले. हे पूर्ण ग्रहण म्हणजेच ‘ब्लड मून’ पावसामुळे भारतात काही मोजक्याच ठिकाणी दिसले. २०२२ नंतर भारतात दिसणारे हे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण होते.
रात्री १० वाजल्यापासून ३ तास २८ मिनिटांपर्यंत चंद्रग्रहणाचे दृश्य खगोल अभ्यासकांना पाहता आले. यापैकी ८२ मिनिटे पूर्ण चंद्रग्रहण होते. या काळात पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आल्याने त्याची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र लाल-केशरी रंगाचा दिसून येतो. यालाच ‘ब्लड मून’ म्हणतात. २७ जुलै २०१८ नंतर पहिल्यांदाच भारतातील सर्व भागातून हे ग्रहण दिसणार होते, मात्र पावसामुळे ते अनेक ठिकाणी दिसू शकले नाही.
या भागांत दिसले चंद्रग्रहण
हे ग्रहण भारत, आशिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि युरोपसह जगाच्या अनेक भागातून दिसले. मात्र, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये चंद्रग्रहणाचे प्रदीर्घ काळ व सर्वोत्तम दृश्य दिसले. युरोप आणि आफ्रिकेतील लोक चंद्रोदयाच्या वेळी थोड्या काळासाठी हे ग्रहण पाहू शकले.