मध्‍य प्रदेश मंत्रिमडळाचा विस्‍तार, २८ जणांनी घेतली शपथ

सोमवारी शपथ घेतलेल्या २८ मंत्र्यांपैकी १८ जणांनी कॅबिनेट मंत्री, ४ राज्यमंत्री आणि ६ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत.
मध्‍य प्रदेश मंत्रिमडळाचा विस्‍तार, २८ जणांनी घेतली शपथ
PM

भोपाळ : मध्य प्रदेशमध्‍ये सोमवारी मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यासह २८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदी तर राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांनी उपमुख्यमंत्री १३ डिसेंबरलाच शपथ घेतली होती.

सोमवारी शपथ घेतलेल्या २८ मंत्र्यांपैकी १८ जणांनी कॅबिनेट मंत्री, ४ राज्यमंत्री आणि ६ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत. कैलाश विजयवर्गीय आणि प्रल्हाद पटेल यांच्याशिवाय विजय शहा, करण सिंह वर्मा, राकेश सिंह आणि उदय प्रताप यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच संपतिया उईके, तुलसीराम सिलावत, एडल सिंग कसाना, गोविंद सिंग राजपूत आणि विश्वास सारंग यांनीही मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ३ समर्थकांना मंत्री करण्यात आले आहे. यापूर्वी २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ९ समर्थकांना मंत्री करण्यात आले होते. त्यामुळे शिवराज सिंह यांच्या सरकारच्या तुलनेत नव्या सरकारमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वजन कमी झाल्याचे बोलले जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ३५ कॅबिनेट मंत्री असू शकतात. मंत्रिमडळ विस्‍तारानंतर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन केले जाईल. भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकार दमदार वाटचाल करेल.”

मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणूक नोव्‍हेंबरमध्‍ये पार पडली. भाजपने १६३ जागा मिळवत सत्ता स्‍थापन केली. काँग्रेसला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in