काँग्रेसला मोठा धक्का? कमलनाथ दिल्लीत पोहोचले, मुलगा नकुलनाथने 'एक्स'बायोमधून काँग्रेस हटवले; भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे चिरंजीव, छिंदवाडा काँग्रेसचे खासदार, नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण
काँग्रेसला मोठा धक्का? कमलनाथ दिल्लीत पोहोचले, मुलगा नकुलनाथने 'एक्स'बायोमधून काँग्रेस हटवले; भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण
(संग्रहित छायाचित्र)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अजून एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे चिरंजीव, छिंदवाडा येथून काँग्रेसचे खासदार, नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच नकुलनाथ यांनी त्यांच्या 'एक्स' या सोशल मीडिया प्रोफाईलमधून काँग्रेसचा उल्लेख हटवल्याचे समोर आले असून, या चर्चांना अजूनच बळ मिळाले आहे.

मध्य प्रदेश भाजपचे प्रमुख व्ही डी शर्मा यांनी एक दिवसापूर्वीच भाजपचे दरवाजे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी खुले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर नकुलनाथ यांनी सोशल मीडिया अकाउंटवरील स्वतःच्या बायोमधून ‘काँग्रेस’ काढून टाकले आहे. शिवाय, काँग्रेस हायकमांडने औपचारिक घोषणा केली नसतानाही नकुल यांनी अलीकडेच छिंदवाडा येथून आपण लोकसभेचा उमेदवार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष कमलनाथ यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्याकडे लागले आहे. आज दुपारी ते भोपाळहून चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचले. यावेळी, भाजपमध्ये सामील होत आहात का? असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता, "तुम्ही सर्व का उत्साही आहात? यात नाकारण्यासारखे काही नाही. असे काही असेल तर मी तुम्हा सर्वांना कळवीन..." असे कमलनाथ म्हणाले.

जबलपूरचे महापौर जगत बहादूर सिंग ‘अन्नू’ यांच्यासह नाथ यांच्या जवळच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर, शुक्रवारी, कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल विचारले असता, “जर कोणाचा भाजपच्या नेतृत्वावर विश्वास असेल आणि त्यांच्या धोरणांवर विश्वास असेल तर अशा लोकांसाठी दरवाजे खुले आहेत… आम्ही काँग्रेसमधील त्या लोकांसाठी आमचे दरवाजे उघडले आहेत, ज्यांना वाटते की त्यांच्या पक्षाने राम मंदिराच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भारताच्या मनात राम आहे. काँग्रेसने त्यांचा (रामाचा) अपमान केला. या नेत्यांच्या मनात त्याबद्दल जर वेदना असतील तर त्यांना संधी दिली पाहिजे आणि तुम्ही जे नाव (कमलनाथ) घेत आहात, जर त्यांच्या मनातही अशी वेदना असेल तर मला वाटते की त्यांचे स्वागत आहे," असे व्ही डी शर्मा म्हणाले होते.

दिग्विजय सिंहानी फेटाळले वृत्त

दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या फेटाळून लावल्या. “मी काल रात्रीच कमलनाथ यांच्याशी बोललो, ते छिंदवाड्यात होते. ज्या व्यक्तीने नेहरू-गांधी घराण्यासोबत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली… सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिला…अशी व्यक्ती पक्ष सोडण्याची अपेक्षा तुम्ही करू शकता का? तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका.” असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in