

इंदूर : धार येथील वादग्रस्त भोजशाळा संकुल हे वाग्देवी म्हणजेच सरस्वती मातेचे मंदिर असल्याचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केले. या ऐतिहासिक निकालानंतर न्यायालयाने मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र जमिनीची मागणी करण्याची सूचना केली आहे.
धार जिल्ह्यातील या पुरातत्व विभागाच्या संरक्षित वास्तूबाबत गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या संकुलात सरस्वती मंदिर आणि संस्कृत शिक्षण केंद्र असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
न्या. विजय कुमार शुक्ला आणि न्या. आलोक अवस्थी यांच्या इंदूर खंडपीठाने या प्रकरणातील पाच याचिका आणि एका रिट अपिलावर ६ एप्रिलपासून नियमित सुनावणी सुरू केली होती. ऐतिहासिक दावे, कायदेशीर तरतुदी आणि हजारो कागदपत्रांच्या आधारे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १२ मे रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. हिंदू समाज भोजशाळेला सरस्वती मंदिर मानतो, तर मुस्लिम पक्ष याला 'कमल मौला मशीद' म्हणतो. दरम्यान, जैन समाजाच्या याचिकाकर्त्यांनी ही वास्तू मध्ययुगीन जैन मंदिर आणि गुरुकुल असल्याचा दावा केला होता.
अहवाल पक्षपाती असल्याचा आरोप
या वादाची पार्श्वभूमी २००३ पर्यंत जाते, जेव्हा 'एएसआय'ने हिंदूंना दर मंगळवारी पूजा करण्याची आणि मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज पठण करण्याची परवानगी दिली होती. हिंदू पक्षाने या आदेशाला आव्हान देत संकुलावर केवळ आपलाच अधिकार असल्याची मागणी केली होती. मुस्लिम पक्षाने 'एएसआय'चा अहवाल पक्षपाती असल्याचा आरोप केला होता, मात्र तीन मुस्लिम तज्ज्ञांच्या उपस्थितीतच हे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे 'एएसआय'ने न्यायालयात स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार २२ मार्च २०२४ रोजी सुरू झालेले हे ९८ दिवसांचे वैज्ञानिक सर्वेक्षण १५ जुलै रोजी पूर्ण झाले होते.