

भोपाळ : मध्य प्रदेशात जानेवारी २०२४ पासून गेल्या १४ महिन्यांत एकूण १४९ बिबट्यांचा मृत्यू झाला असून रस्ते अपघातांमुळे सर्वाधिक जीवितहानी झाल्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय दुबे यांनी विचारलेल्या प्रश्नाला वनविभागाने दिलेल्या उत्तरात ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. देशातील बिबट्यांच्या संख्येच्या २०२२ च्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात सर्वाधिक ३,९०७ बिबटे असून त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४९ मृत्यूंपैकी ३१ टक्के मृत्यू रस्ते अपघातांमुळे झाले असून त्यातील १९ मृत्यू महामार्गांवर झाले आहेत. वृद्धापकाळ आणि आजार यांसारख्या नैसर्गिक कारणांमुळे २४ टक्के, तर वन्यप्राण्यांमधील संघर्षात २१ टक्के बिबट्यांचा मृत्यू झाला. शिकार आणि सूडबुद्धीने केलेल्या हल्ल्यांमध्ये १४ टक्के मृत्यू झाले असून ८ प्राण्यांचा विजेच्या धक्क्याने, तर २ बिबट्यांचा फासामुळे मृत्यू झाला. सुमारे ९ टक्के प्रकरणांमध्ये मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एल. कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, बिबट्यांचे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन रस्त्यांवर प्राण्यांसाठी मार्गिका, फलक आणि नियमित गस्त यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. बिबटे मानवी वस्त्यांच्या जवळ आढळत असल्याने रस्त्यांजवळ पाण्याचे स्त्रोत तयार न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील बिबट्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हा मृत्युदर केवळ ४ टक्के असून तो मान्य मर्यादेत असल्याचे एका वरिष्ठ वनधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर नमूद केले.
कार्यकर्ते अजय दुबे यांनी मात्र या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश बिबट्यांसाठी स्मशानभूमी बनत असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश आणि सुरक्षित कॉरिडॉरचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रस्ते अपघात आणि विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंबाबत कोणतीही जबाबदारी निश्चित केली जात नसल्याचेही दुबे यांनी म्हटले आहे.
बिबट्यांचा मृत्यू चिंताजनक
मध्य प्रदेशात बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे ही बाब चिंताजनक आहे. विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंबाबत कोणतीही जबाबदारी निश्चित केली जात नसल्याचेही दुबे यांनी म्हटले आहे.