
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही सोमवारी जाणार आहेत. तेथे त्या गंगा, यमुना आणि लुप्त सरस्वती नद्यांच्या संगम स्थानी पवित्र स्नान करणार आहेत.
पौष पौर्णिमेला (१३ जानेवारी) सुरू झालेला महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, जो जगभरातील भाविकांना आकर्षित करतो. हा मेळा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रयागराज येथील राष्ट्रपतींच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संगम येथे पूजा करून पवित्र स्नान करतील. अक्षयवट आणि हनुमान मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. तसेच डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.