

नवी दिल्ली: सहा हजार कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओमानमधून प्रत्यार्पण केले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
ओमानमध्ये तैनात केलेल्या सीबीआयच्या पथकाने चंद्राकरला भारतात आणले आहे. सोमवारी त्याला छत्तीसगडमधील रायपूर येथील विशेष न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चंद्राकरचा सीबीआयच्या दोन प्रकरणांमध्ये आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका प्रकरणात शोध सुरू होता. या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने निवेदनाद्वारे दिली.
चंद्राकरविरोधात जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे ओमानच्या रॉयल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मस्कत येथून माहिती मिळाल्यानंतर सीबीआय आणि ईडीने आरोपीविरोधात गोळा केलेल्या सर्व पुराव्यांसह ओमान सरकारकडे प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला.