सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला त्यांनी ९९ वर्षांच्या करारावर एक हजार एकर जमीन मोफत देऊ केली
 सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

सुमारे एक लाख ६० हजार कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा सेमीकंडक्टरचा प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. हा प्रकल्प अहमदाबादला खेचून नेण्यात गुजरात सरकारला यश आले आहे. हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला त्यांनी ९९ वर्षांच्या करारावर एक हजार एकर जमीन मोफत देऊ केली आहे. शिवाय वीज आणि पाण्याचा २० वर्षे सवलतीच्या दरात पुरवठा केला जाणार आहे.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला सेमीकंडक्टर (चीप)ची गरज असते. या चीपनिर्मितीत जगात तैवान आघाडीवर आहे. भारतात चीपनिर्मितीचा एकही प्रकल्प नाही. त्यासाठी भारतात काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी वेदांत लिमिटेडकडून हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती.

तैवानची फॉक्सकॉन कंपनी भागीदार

तैवानची फॉक्सकॉन कंपनी या प्रकल्पात भागीदार कंपनी असून तिच्या सहकार्याने हा प्रकल्प आकारास येणार आहे. या प्रकल्पात डिस्प्ले व सेमीकंडक्टर बनवले जाणार असून अहमदाबादजवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारताची सेमीकंडक्टरची बाजारपेठ २०२६ पर्यंत ६३ अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये ही बाजारपेठ १५ अब्ज डॉलर्सची होती.

गुजरातकडून सवलतींचा वर्षाव

गुजरातने सवलतींचा वर्षाव करत इतर राज्यांवर मात करीत या प्रकल्पापोटी होणारी सुमारे एक लाख ६० हजार कोटींची गुतवणूक आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. या प्रकल्पासाठी वेदांतला वित्तीय व अन्य अनुदान दिले जाणार आहे. तसेच प्रकल्प उभारणीनंतर गुजरात सरकारकडून प्रकल्पाला स्वस्त वीज व पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in