झारखंडमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’? पळवापळवीमुळे आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या हालचाली

झारखंडमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’? पळवापळवीमुळे आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या हालचाली

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार अडचणीत आले आहे.

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार अडचणीत आले आहे. अटक होण्याआधी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी तातडीची बैठक घेत विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी चंपाई सोरेन यांची निवड झाली. त्यानंतर सोरेन यांनी राज्यपालांकडे ४३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने सत्ताधाऱ्यांकडे १८ आमदार कमी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आमदारांच्या पळवापळवीला जोर आला असून झारखंडमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झारखंडमधील राजकीय उलथापालथीदरम्यान महाआघाडीच्या आमदारांना राज्याबाहेर पाठवण्यात येत आहे. भाजपकडून खोक्यांची आमिषे दाखवून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असल्यामुळे महाआघाडीच्या आमदारांना एकत्र करून तेलंगणात पाठवले जात आहे. अनेक तास उलटून गेल्यानंतरही चंपाई सोरेन यांना राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरू होऊन काही आमदारांचे फोन बंद येत असल्यामुळे झारखंडच्या राजकीय वर्तुळात सत्तापालट होण्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता अखेर राज्यपालांनी चंपाई सोरेन यांना गुरुवारी संध्याकाळी भेटीसाठी बोलावल्यामुळे ते लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांतील फोडाफोडीचे राजकारण पाहता, महाआघाडीच्या आमदारांना तेलंगणातील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. या काळात महाआघाडीतील पाच आमदार रांचीमध्येच राहून राजकीय घडामोडींवर नजर ठेवतील. यामध्ये चंपाई सोरेन, आलमगीर आलम, सत्यानंद भोक्ता यांच्यासह दोन अन्य आमदारांचा समावेश आहे. तेलंगणात पाठवण्यात येत असलेले आमदार विश्वास प्रस्तावाच्या वेळी रांचीत परततील, असा प्लान बी तयार करण्यात आला होता. मात्र आता राज्यपालांनी भेटीसाठी बोलावल्याने हा प्लॅन रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही भाजप सक्रिय झाल्याने झारखंड मुक्ती मोर्चासहित आरजेडी आणि काँग्रेस या महाआघाडीच्या आमदारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जवळपास ३५ आमदारांना विमानाने रांचीहून हैदराबादला पाठवले जाणार आहे. जर गुरुवारी राज्यपालांकडून सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण न मिळाल्यास गुरुवारी रात्रीच या आमदारांना हैदराबादला पाठवले जाईल. आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि राजकीय घोडेबाजाराची परिस्थिती येऊ नये, यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सला जोर आला आहे. राज्यपालांकडून निमंत्रण आल्यास, गुरुवारीच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

कल्पना सोरेन यांना १८ आमदारांचा विरोध

हेमंत सोरेन यांच्या अटकेपूर्वी त्यांची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यानंतर हेमंत सोरेन यांचे विश्वासू साथीदार चंपाई सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले. मात्र, कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यावरून सोरेन यांच्या घरातूनच विरोध आहे. कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यास २९ पैकी १८ आमदारांचा विरोध होता, असा दावा भाजप नेते निशिकांत दुबे यांनी केला आहे.

आमदारांच्या विमानांचे टेक ऑफ रद्द

झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सायंकाळी राज्यपालांची भेट झाल्यानंतरही सरकार स्थापन करण्यास अजून २६ तासांनंतरही हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसच्या आमदारांना घोडाबाजार रोखण्यासाठी हैदराबादला नेण्यात येत होते. ४१ आमदार रांची विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासाठी दोन चार्टर्ड विमाने तयार होती. मात्र हवामान खराब असल्याने त्या विमानांना उड्डाण घेण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सर्व आमदार रात्रीच्या सुमारास पुन्हा रांचीच्या गेस्टहाऊसवर परतले.

logo
marathi.freepressjournal.in