नवी दिल्ली : तुष्टीकरणाचा सामना कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिले. महाराष्ट्राने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीसाठी हा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विजयाचे कौतुक केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत कामगिरी केली. यानिमित्त दिल्लीतील भाजप मुख्यालयात विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोदी म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांना २३० हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला असून घराणेशाहीचा पराभव झाला आहे. आज महाराष्ट्रात विकासवाद, सुशासन आणि सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे, तर विभाजनकारी शक्ती, नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा पराभव झाला आहे. आज महाराष्ट्राने विकसित भारताच्या निश्चयाला बळ दिले आहे. यासाठी मी भाजप, एनडीएच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुतीचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कौतुक केले.
“उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानने भाजपला मोठा पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेश, बिहारमध्येही एनडीएला पाठिंबा मिळाला आहे. यातून देशाला फक्त आणि फक्त विकास हवा आहे”, असेही मोदी म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद देत विजयी केले आहे. भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची ही तिसरी वेळ आहे. हे निश्चितपणे ऐतिहासिक आहे. फक्त भाजपला काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त जागा महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या आहेत. सुशासनाच्या मुद्द्यावर देश फक्त भाजपवर आणि एनडीएवर विश्वास ठेवतो हे दिसून येते, असेही पंतप्रधान म्हणाले
महाराष्ट्र देशातील सहावे राज्य आहे, ज्याने भाजपला लागोपाठ तीन वेळा बहुमत दिले आहे. यापूर्वी आपण गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरयाणा आणि मध्य प्रदेश येथे लागोपाठ तीन वेळा विजयी झालो आहोत.
निकालातून ‘एकजुटता’ हाच संदेश
बिहारमध्येदेखील एनडीएने तीन वेळा विजय मिळवला आहे. हा आमच्या सुशासनाच्या मॉडेलवरील विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले. हरयाणानंतर महाराष्ट्र निवडणुकीचा देखील ‘एकजुटता’ हाच संदेश असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी ‘एक है, तो सेफ है’ अशी घोषणा दिली.