उत्तराखंड दुर्घटना : महाराष्ट्रातील अडकलेले ५१ पर्यटक सुखरूप; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

उत्तराखंड दुर्घटना : महाराष्ट्रातील अडकलेले ५१ पर्यटक सुखरूप; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते.
Published on

मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांशी संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. तेथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील २४ जणांचा एक गट पर्यटनासाठी उत्तराखंड येथे गेला होता. या सर्वांशी प्रारंभी संपर्क होत नव्हता, मात्र नंतर त्यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूरचे ४ पर्यटक सुरक्षित

सोलापूरचे चार तरुण चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये गेले होते. काल दुपारपासून त्यांचा संपर्क होत नव्हता त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता त्यांचा संपर्क झाला असून ते गंगोत्रीमध्ये सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्याचे धनराज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोत्रे हे चार भाविक अडकले होते. हे भाविक हरिद्वार येथे दर्शनासाठी गेले होते.

बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर

या भीषण दुर्घटनेनंतर भारतीय लष्कर, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम हाती घेतली आहे. भारतीय लष्कराने १५० जवान, ट्रॅकर डॉग्स, ड्रोन आणि जमीन सरकवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी तैनात केली आहे. ‘आयटीबीपी’च्या जवानांनी धराली गावातून दोन लोकांना जिवंत बाहेर काढले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाची चिनूक, एमआय १७ व्ही ५, एएलएच आणि चीता हेलिकॉप्टर्स चंदिगड हवाई तळावर सज्ज ठेवण्यात आली आहेत. हवामान सुधारताच मदत साहित्य आणि उपकरणांसह ती घटनास्थळी रवाना होतील. बिघडलेल्या हवामानामुळे आणि बचावकार्यातील आव्हानांमुळे उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सर्व सरकारी आणि खाजगी शाळांसह अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोदींचे स्थितीवर लक्ष मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून उत्तराखंडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः आपत्तीग्रस्त धराली भागाची पाहणी केली. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बाधित लोकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन पूर्ण सतर्कतेने काम करत आहे, असे त्यांनी ‘एक्स’वरून सांगितले.

हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये, विशेषतः डोंगराळ जिल्ह्यांमध्ये, मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे, ज्यामुळे बचाव पथकांसमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत. या घटनेमुळे हिमालयाच्या संवेदनशील पर्यावरणाचा आणि मान्सूनच्या काळात वाढणाऱ्या धोक्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

उत्तराखंड दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक बेपत्ता

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि सुखी टॉप परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या महापूर आणि भूस्खलनामुळे मोठे संकट ओढवले असून या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर लष्कराच्या ११ जवानांसह १०० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या या प्रकोपात नयनरम्य धराली गावाचा अर्धा भाग चिखल आणि पाण्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला असून, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १३० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

किन्नौरमध्ये ४१३ जणांची सुटका

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. किन्नौर - कैलास ट्रेक मार्गावर दोन तात्पुरते पूल वाहून गेल्याने शेकडो यात्रेकरू अडकले होते. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तत्काळ कारवाई करत 'झिपलाइन'च्या साहाय्याने ४१३ यात्रेकरूंची सुरक्षित सुटका केली.

logo
marathi.freepressjournal.in