

मुंबई : मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता ‘भारतीय हवामान विभाग’ यांनी वर्तवली आहे. या महिन्यात किमान तापमान आणि पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असून काही भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त असू शकतात.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण द्वीपकल्प आणि ईशान्य व वायव्य भारताचे काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान मात्र देशाच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात देशात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सामान्यपेक्षा ११ टक्के कमी आहे. मार्च ते एप्रिलदरम्यान देशातील पाऊस ६८.८ मिलिमीटर होता, जो सामान्यपेक्षा जवळपास एक टक्का कमी होता. एप्रिलमध्ये दक्षिण द्वीपकल्पातील पाऊस २००१ नंतरचा चौथा आणि १९०१ नंतरचा दहावा सर्वात कमी पाऊस ठरला, तर संपूर्ण देशात एप्रिलचा पाऊस २००१ नंतरचा दहावा आणि १९०१ नंतरचा चाळीसावा सर्वात कमी पाऊस राहिला. एप्रिलच्या पूर्वार्धात पश्चिमी विक्षोभ आणि मेघगर्जनेच्या हालचालींमुळे कमाल तापमानावर नियंत्रण होते. त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने उष्णतेची लाट निर्माण झाली, तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेघगर्जनेमुळे तापमानात घट झाली.
मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
'भारतीय हवामान विभाग'चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले की, अधिक पावसाची अपेक्षा असताना रात्रीचे तापमान अधिक राहते आणि हवामान बदलामुळेही अशा परिस्थितीचे प्रमाण वाढत आहे. देशात मे महिन्यात होणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या १११ टक्क्यांपेक्षा जास्त, म्हणजेच सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० च्या आकडेवारीनुसार उत्तर भारत आणि देशातील मे महिन्याची दीर्घकालीन सरासरी ६४.१ मिलिमीटर आहे.
हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेश, पूर्व किनारपट्टीची राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा जास्त राहू शकतात. मात्र, उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाचा फटका बसणाऱ्या मध्य भारतात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा कमी राहतील.
मे महिन्यातील पावसाचा उन्हाळी पिकांना फायदा
मे महिन्यातील तापमानाचा अंदाज पाहता उत्तर आणि वायव्य भारतात उशिरा काढणीला आलेल्या रब्बी पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहू शकते. सामान्य किंवा त्यापेक्षा कमी कमाल तापमानामुळे उष्णतेचा ताण कमी होऊन पीक वाढीस मदत होईल. मात्र, किमान तापमान वाढल्यामुळे तांदूळ, मका आणि कडधान्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, मे महिन्यातील सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे उन्हाळी पिकांना फायदा होईल, परंतु रब्बी पिकांच्या काढणी व मळणीच्या कामात विलंब होण्याची शक्यता आहे.