
नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनात यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रातील चित्ररथाला तूर्त स्थान मिळालेले नाही. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंदिगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरयाणा या राज्यांचा समावेश आहे. प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाला अद्याप स्थान मिळाले नसल्याचे वृत्त समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे समोर आले आहे. राजधानीच्या चित्ररथाला नाकारण्याची ही चौथी वेळ आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मागील कित्येक वर्षांपासून दिल्लीच्या चित्ररथाला संचलनात सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे, हे कसले राजकारण, दिल्लीच्या लोकांचा हे इतका का तिरस्कार करतात, असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांच्या चित्ररथांची निवड वेगवेगळ्या नियोजित निकषांनुसार केली जाते. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे चित्ररथांच्या निवडीची प्रक्रिया आयोजित केली जाते. या प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांकडून प्रस्ताव मागवण्यापासून होते. या प्रस्तावात चित्ररथांसाठी एक विशिष्ट विषय नमूद केला जातो आणि हा विषय भारतीय संस्कृती, परंपरा, विशेष राष्ट्रीय कामगिरी किंवा उपक्रमासंबंधी असतो. चित्ररथांमधील नाविन्य आणि विविधतेसाठी हा विषय दरवर्षी बदलत राहतो. संचलनात चित्ररथांच्या कल्पक विषयाला अधिक महत्त्व दिले जाते.
प्रस्ताव स्वीकारल्यानंतर कलाकार, इतिहासकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेली एका समिती तयार केली जाते.