१७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

अप्रेंटिसशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 १७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृतमहोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे त्याचबरोबर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धतेबाबत माहिती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटिसशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीइच्छुक उमेदवार आणि उद्योजक यांना या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार असून, पात्र उमेदवारांना तिथेच नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री लोढा म्हणाले की, महारोजगार मेळावा आणि त्याबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधून मराठवाड्यातील रोजगार उपलब्धतेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) या मेळाव्याचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनस्थळी विविध उद्योजक आपले स्टॉल मांडणार असून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांवर उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. मेळावास्थळी विविध इंडस्ट्री असोसिएशन यांचेही स्टॉल असणार आहेत. स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मॅजिक इंडस्ट्रीज असोसिएशन हे इन्क्युबेटर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत विविध स्टार्टअप्सचे प्रदर्शन आणि सादरीकरण आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याचबरोबर फोटो गॅलरी आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून कौशल्य, उद्योजकता आणि महारोजगार मेळाव्याची माहिती देण्यात येणार आहे. युवक-युवतींना कौशल्य विकास आणि रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या माध्यमातून व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे लोढा यांनी सांगितले.

मेळाव्यास मंत्री लोढा यांच्यासह केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in