
मुंबई : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील महेश कुमार याने ७२० पैकी ६८६ गुण पटकावत नीट परीक्षेत देशात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने शनिवारी नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशी याने देशात तिसऱ्या क्रमांकावर येण्याची किमया केली आहे.
वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि वैद्यकीय पूरक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून (एनटीए) नीट घेतली जाते. यंदा ४ मे रोजी देशातील आणि विदेशातील ५४६८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. २२ लाख ९ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यानंतर आता १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. उत्तीर्ण झालेल्या एकूण उमेदवारांमध्ये ५ लाख १४ हजार ०६३ पुरुष, ७ लाख २२ हजार ४६२ महिला आणि ६ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
अव्वल १० जणांमध्ये राजस्थानचे चार उमेदवार असल्याने यंदा एआयआर-१ ही रँक राजस्थानला मिळाली आहे. सीकर येथील एका प्रसिद्ध करिअर संस्थेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून तयारी करणाऱ्या महेश कुमारने ९९.९९९९५४७ पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. दिल्लीची अविका अग्रवाल नीट यूजी २०२५ परीक्षेत मुलींमध्ये अव्वल ठरली असून तिने ९९.९९९६८३२ पर्सेंटाईल गुणांसह एआयआर-५ ही रँक पटकावली आहे. महाराष्ट्राचा आरव अग्रवाल हा ९९.९९९५४७४ पर्सेंटाइल गुणांसह १०व्या रँकवर आहे.