दिल्लीत पुन्हा 'महिलाराज'; रेखा गुप्ता नव्या मुख्यमंत्री, तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री, नव्या सरकारचा आज शपथविधी

दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेल्या भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याने त्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार आहेत.
रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा
रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा
Published on

नवी दिल्ली : दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेल्या भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याने त्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असलेल्या प्रवेश वर्मा यांनीच गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वर्मा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील, तर रोहिणी मतदारसंघातील भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष असतील.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पक्षाचे वरिष्ठ नेते ओ.पी. धनखर आणि रविशंकर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतर रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रवेश वर्मा यांनीच रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. दरम्यान, रेखा गुप्ता गुरुवारी दुपारी १२.३० वाजता रामलीला मैदानावर एका समारंभात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे.

११ दिवसांनी घोषणा

दिल्लीत २६ वर्षांनंतर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. त्यामध्ये भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या. निकालानंतर ११ दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दोन वेळा विधानसभेला पराभूत

रेखा गुप्ता यांचा २०१५ आणि २०२० ला विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. २०१५ आणि २०२० मध्ये आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावेळी रेखा गुप्ता यांनी वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

गुप्तांचा राजकीय प्रवास

रेखा गुप्ता संघाच्या विचारसरणीच्या असून विद्यार्थी संघटनेपासून भाजपात कार्यरत आहेत. दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी १९९४-९५ ला त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव होत्या, तर १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या त्या अध्यक्ष बनल्या. तर २००७ मध्ये त्या उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. त्यांची २०१० मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील.

logo
marathi.freepressjournal.in