२०२४ च्या प्रजासत्ताक संचलनात ‘महिलाराज’

सर्व पथकांमध्ये केवळ महिलांचा सहभाग : संरक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव
२०२४ च्या प्रजासत्ताक संचलनात ‘महिलाराज’
Published on

दिल्लीच्या कर्तव्य पथावरील २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये लष्कराच्या सर्व दलांच्या पथकांमध्ये केवळ महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. शिवाय सर्व दलांची बँड पथके, राज्यांचे चित्ररथ आणि नाट्य पथकांमध्येही महिलांचाच समावेश असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात केंद्र सरकारने ‘नारीशक्ती’चा नारा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून २०२४ च्या संचलनात १०० टक्के महिलांचा समावेश असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने तयार केला आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या उत्सव समितीने केंद्रीय गृह, गृहनिर्माण आणि नागरी तसेच सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, लष्कर प्रमुख यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे की, यावर्षीच्या प्रजासत्ताक परेडनंतर ७ फेब्रुवारी रोजी संरक्षण सचिव गिरीधर अरामणे यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन २०२४ च्या प्रजासत्ताक संचलनात सर्व महिलांचा समावेश असेल, असे सांगितले होते.

मार्च महिन्यात संरक्षण मंत्रालयाने आपल्या तिन्ही दलांसह विविध मंत्रालयांना एक परिपत्रक पाठवून २०२४ च्या संचलनाच्या नियोजनाची आठवण करून दिली होती. भारतीय हवाई दलाने यावर्षीच्या संचलनात सहभागी झालेल्या आपल्या १४४ जणांच्या पथकाचे नेतृत्व एका महिला अधिकाऱ्याकडे दिले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० साली पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन आयर्विन स्टेडियमवर (सध्याचे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण) साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर १९५१ पासून आजअखेर राजपथावर संचलन केले जाते.

महिलांची संख्या कमीच

भारतीय सशस्त्र दलांमध्ये १९९० साली पहिल्यांदा महिलांचा समावेश झाला, तोही अधिकारी म्हणून. या दलाच्या ६५ हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये तिन्ही दलांच्या मिळून केवळ ३९०० महिला अधिकारी आहेत. याशिवाय १६७० डॉक्टर, १९० डेंटिस्ट आणि ४७५० नर्सेस लष्करात कार्यरत आहेत. या सर्वांना अधिकारी दर्जा आहे, पण आता २०१९-२० पासून लष्कराच्या पोलीस दलात १०० महिला जवान कार्यरत आहेत. केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेतून २७३ महिला अग्निवीर नौदलात सहभागी झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in