नवी दिल्ली : लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या २ नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी नीतिमत्ता समितीसमोर हजर राहणार आहेत.
याविषयी महुआ मोईत्रा म्हणाल्या की, “मी २ नोव्हेंबरला लोकसभेच्या नीतिमत्ता समितीसमोर हजर होणार आहे. या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांवर त्यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांची उलटतपासणी करण्यात यावी.” यापूर्वी मोईत्रा यांनी ५ नोव्हेंबरनंतर सुनावणीची तारीख मागितली होती, मात्र समितीने २ नोव्हेंबरनंतरची तारीख देण्यास नकार दिला होता.
माझ्यावरील कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी नीतिमत्ता पालन समितीचे व्यासपीठ योग्य आहे का? असा सवाल महुआ मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे. संसदीय समित्यांकडे गुन्हेगारी अधिकार क्षेत्राचा अभाव आहे आणि अशा प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना सामील करून घेण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. आचार समितीने पाठवलेल्या समन्सचा सन्मान म्हणून मी २ नोव्हेंबर रोजी समितीसमोर हजर राहणार आहे.
महुआ मोईत्रा यांना हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी पैसे आणि महागड्या भेटवस्तू दिल्या आणि त्या बदल्यात महुआ यांनी संसदेत त्यांचे प्रश्न विचारले, असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.