बिहार विधानसभा निवडणूक : जदयूची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; भाजपने गायिका मैथिली ठाकूर यांना दिली उमेदवारी

बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी जदयूच्या ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये अनेक विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, भाजपने १२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये पक्षात कालपरवाच प्रवेश केलेल्या गायिका मैथिली ठाकूर यांना दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणूक : जदयूची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; भाजपने गायिका मैथिली ठाकूर यांना दिली उमेदवारी
Published on

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी जदयूच्या ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये अनेक विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, भाजपने १२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये पक्षात कालपरवाच प्रवेश केलेल्या गायिका मैथिली ठाकूर यांना दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

जदयूने राजदमधून पक्षात परतलेल्या श्याम रजक यांना आणि गुंड अनंतकुमार सिंह यांनाही उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांना मनहरमधून उमेदवारी दिली आहे.

भाजपने पहिल्या यादीत ७१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत १२ उमेदवार असून, मैथिली ठाकूर यांच्या पक्षप्रवेशानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मैथिली ठाकूरने मंगळवारी पाटणा येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशानंतर मैथिली ठाकूर यांच्या निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मैथिली ठाकूर यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजपने बक्सर विधानसभा मतदारसंघातून आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in