"हॉटेलमध्ये बोलवत होता..."; अभिनेत्रीचे नेत्यावर गंभीर आरोप, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्ज हिने केरळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे.
"हॉटेलमध्ये बोलवत होता..."; अभिनेत्रीचे नेत्यावर गंभीर आरोप, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
Published on

मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्ज हिने केरळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. युवा नेत्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवले, तसेच पंचतारांकीत हॉटेलमध्येही बोलावले होते, असा दावा अभिनेत्रीने केला. याप्रकाराबाबत संबंधित राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही रिनीने केला. यावेळी अभिनेत्रीने कोणत्याही राजकीय पक्षाचे अथवा नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र, ही बाब समोर येताच भाजपने केरळ काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

तीन वर्षांपासून सुरू होता छळ

बुधवारी (दि.२०) कोच्चीमध्ये माध्यमांशी बोलताना अभिनेत्री रिनी जॉर्ज हिने सांगितले की, ती ३ वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे केरळमधील एका राजकीय पक्षाच्या युवा नेत्याच्या संपर्कात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून तो तिच्याशी गैरवर्तन करत आहे. त्या नेत्याने तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिला अश्लील आणि आक्षेपार्ह संदेश पाठवले. नंतर, नेत्याने एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेटण्यासही बोलावले होते. याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याचा इशारा त्याला दिला होता. मात्र, त्यावरही जिथे तक्रार करायची तिथे कर, काही फरक पडत नाही असे उत्तर तिला मिळाले होते, असे रिनी जॉर्जने सांगितले.

त्या पक्षाला 'लाजवायचे' नाही

पक्षाकडे तक्रार करूनही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर कारवाई झाली नाही. उलट त्यानंतरही त्याला अनेक महत्त्वाची पदे देण्यात आली, असा दावाही रिनीने केला. नेत्याचे नाव सार्वजनिक का करत नाही अशी विचारणा केली असता सुरक्षिततेची काळजी असल्याचे रिनी म्हणाली. जर मी तक्रार दाखल केली तर मी स्वतःला धोक्यात घालेन. मी देशातील महिलांना लोकप्रतिनिधींची निवड सुज्ञपणे करण्याचे आवाहन करते. संबंधित राजकीय पक्षाला 'लाजवायचे' नाही असेही ती म्हणाली. इतर अनेक महिलांनाही छळाचा सामना करावा लागल्याचं माझ्या मित्रमंडळींकडून समजल्यामुळे मी आता त्यांच्यासाठी बोलत आहे असेही तिने सांगितले.

भाजपकडून हल्लाबोल

अभिनेत्रीने कोणाचेही नाव घेतले नसले तरी भाजप तिच्या आरोपांचा संबंध काँग्रेस नेते आणि पलक्कडचे आमदार राहुल ममकूटाथिल यांच्याशी जोडत आहे. या घटनेच्या विरोधात भाजपने ममकूटाथिल यांच्या पलक्कड कार्यालयावर निषेध मोर्चा काढला आणि राहुल ममकूटाथिल यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in