पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मंत्र्याला मालदीव सरकारची तंबी; म्हणाले, "कारवाई करायला..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावरुन मालदीवच्या उपमंत्री मरियम शिउन यांनी मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मंत्र्याला मालदीव सरकारची तंबी; म्हणाले, "कारवाई करायला..."

मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिउन यांनी केलेल्या वक्तव्याचे भारतात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटत आहेत. शिऊना यांच्याकडून भारत आणि पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. यावर मालदीव सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मंत्र्यांच्या वक्तव्याचे प्रतिनिधीत्व आम्ही करत नाही. तसेच, आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अधिकारी किंवा मंत्री याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे मालदीव सरकारने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावरुन मालदीवच्या उपमंत्री मरियम शिउन यांनी मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर भारतात नाराजी पाहायला मिळाली होती. आता मालदीव सरकारने हे वक्तव्य मंत्र्यांचे व्यक्तिगत असून त्याचा मालदीव सरकारशी कोणताही संबंध नाही, असे सांगितले आहे.

शिउन  यांनी पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर भारताने मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा उचलला होता. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्ताने मंत्र्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. अखेर मालदीव सरकार नमले असून आपल्या मंत्र्याच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे.

काय म्हणाले मालदीव सरकार?

मालदीव सरकारने एक निवेदन जारी केले आहे. यात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लोकशाही पद्धतीने आणि जबाबदारीने केला पाहिजे. द्वेष पसरवणारे, नकारात्मक वक्तव्य करण्यात येऊ नयेत. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सहयोगी देशांशी संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्यावी. आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अधिकारी किंवा मंत्री याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे मालदीव सरकारने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. त्यांनी या दौऱ्यातील काही काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. पर्यटनासाठी ही उत्तम जागा असल्याचे त्यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट मालदीवच्या एका मंत्र्याला चांगलीच झोंबली होती. मालदीवच्या युवा सशक्तीकरण मंत्री मरियम शिऊना यांनी यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी नराजी व्यक्त केली होती.

logo
marathi.freepressjournal.in