मालदीवने गुडघे टेकले,तीन मंत्र्यांची हकालपट्टी : मोदींवरील वक्तव्यानंतर दोन्ही देशांत तणाव

सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर मालदीव सरकारने गुडघे टेकले असून तीन मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
मालदीवने गुडघे टेकले,तीन मंत्र्यांची हकालपट्टी : मोदींवरील वक्तव्यानंतर दोन्ही देशांत तणाव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या लक्षद्वीप दौऱ्यासंदर्भात मालदीवमधील एका नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांत पुन्हा तणाव वाढला आहे. परिणामी अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीवचे नियोजित दौरे रद्द केले असून त्या देशावर बहिष्काराची मागणी होत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनीही ‘बॉयकॉट मालदीव’ची भूमिका घेतली. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर मालदीव सरकारने गुडघे टेकले असून तीन मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. सुरुवातीला मालदीवच्या सरकारने या प्रकरणावर फारशी प्रतिक्रिया दिली नाही. नेत्यांची वक्तव्ये त्यांची खासगी आहेत. त्यांचा सरकारशी संबंध नाही, असे म्हणून सरकारने हात झटकले. नंतर सोशल मीडिया आणि अन्य मार्गांनी दबाव वाढल्यावर मालदीवच्या परराष्ट्र खात्याने सोशल मीडियावरून एक निवेदन जाहीर केले. त्यात भारताविरुद्ध शेरेबाजी करणाऱ्या नेत्यांना पदावरून हटवल्याचे म्हटले होते. पण, निवेदनात त्यांची नावे दिली नव्हती. नंतर मालदीवने मरियम शिऊना, मालशा शरीफ आणि महजूम माजिद या तीन मंत्र्यांना पदावरून हटवल्याचे स्पष्ट झाले. मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोली आणि मोहम्मद नशीद यांनी सोशल मीडियावरील भारतविरोधी वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच मालदीवच्या अर्थव्यवस्थेसाठी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. मालदीवला भारतातून सर्वाधिक पर्यटक जातात. २०२२ साली भारतातून मालदीवला २ लाख ९ हजार पर्यटक गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप बेटांचा दौरा केला. त्या भेटीतील निसर्गरम्य छायाचित्रे सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध झाली. त्यावरून अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट्स शेअर केल्या. त्यातील काही जणांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, 'पंतप्रधानांच्या भेटीमुळे लक्षद्वीपच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि त्यामुळे मालदीवमधील पर्यटकांचा ओघ ओसरेल.’ यावर प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्ज (पीपीएम) या राजकीय पक्षाचे नेते झाहीद रमीझ यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, 'आमच्याबरोबर स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. ते आमच्याइतकी चांगली सेवा कशी पुरवू शकतील? ते आमच्याइतकी स्वच्छता कशी राखू शकतील? तुमच्या हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये कायम येणारा कुबट वास सर्वांत मोठी त्रुटी असेल.’

मालदीवच्या नेत्याच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर रणकंदन माजले आहे. अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत मालदीववर बहिष्काराची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर बऱ्याच भारतीय पर्यटकांनी मालदीवचे नियोजित दौरे रद्द केले आहेत. इतके होऊनदेखील झाहीद रमीझ यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतलेले नाही किंवा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही. उलट त्यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना म्हटले की, 'मी केवळ मुस्लीम असल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे. माझा जन्म भारतातच झाला आहे. तुमच्या माहितीकरिता सांगतो की, मी काही मालदीवचा लोकप्रतिनिधी नाही. अधूनमधून मी ट्विटरच्या माध्यमातून मतप्रदर्शन करत असतो. पण, यावेळी त्यावर इतक्या तीव्र प्रतिक्रिया येणे आश्चर्यकारक आहे. यापेक्षा अधिक कठोर टीका तुमच्या देशाचे नागरिक मुस्लीम आणि पॅलेस्टिनींबद्दल करत आहेत. असो! मी काही नेहमी अशी वक्तव्ये करत नाही. यावेळी माझे मत खपवून घ्या.’

मालदीवच्या कुरघोड्या-

गेल्या काही दिवसांत मालदीवने भारताशी आगळीक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मालदीवमध्ये नुकतेच निवडून आलेले अध्यक्ष मोहम्मद मुईझू चीनधार्जिणे आहेत. निवडून आल्यास भारताला मालदीवमध्ये तैनात केलेले सैन्य मागे घ्यायला लावू, असे वचन त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार त्यांनी निवडून आल्यावर भारताला तेथील सैन्य हटवण्यास सांगितले. तसेच भारताबरोबरील जलसंपत्तीसंदर्भातील करार रद्द केला. आता मालदीवच्या राजकीय नेत्याने केलेल्या वक्तव्यावरून दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in