मालदीव : विरोधी पक्षनेत्यांचा भारताला पाठिंबा; अविश्वास ठरावाचा इशारा, अध्यक्ष मुईझू यांच्या राजीनाम्याची मागणी

अझीम अली यांच्याप्रमाणे अन्य अनेक नेत्यांनीही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
मालदीव : विरोधी पक्षनेत्यांचा भारताला पाठिंबा; अविश्वास ठरावाचा इशारा, अध्यक्ष मुईझू यांच्या राजीनाम्याची मागणी

माले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीवरून केलेली शेरेबाजी मालदीवच्या सरकारला महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणावरून भारतीयांनी बहिष्काराचा पवित्रा घेतल्यानंतर मालदीवच्या सरकारमधील तीन मंत्र्यांची आधीच हकालपट्टी झाली आहे. आता तेथील विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी भारताला पाठिंबा दर्शवत भारतासारख्या विश्वासू मित्राला दुखावल्याबद्दल अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) नेते आणि विरोधी खासदार अझीम अली यांनी मुईझू यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले आहे की, 'आमचा पक्ष देशाच्या परराष्ट्र धोरणातील स्थैर्य राखण्यास आणि कोणत्याही शेजारी देशाला एकटे पाडण्याला विरोध करण्यास कटिबद्ध आहे. आपण अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांना सत्तेतून हटवण्यास इच्छुक आहोत का? आपला पक्ष त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव सादर करण्यास तयार आहे का?’

अझीम अली यांच्याप्रमाणे अन्य अनेक नेत्यांनीही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. मालदीवच्या संसदेच्या माजी उपसभापती इव्हा अब्दुल्ला यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘मालदीव सरकारच्या बडतर्फ केलेल्या मंत्र्यांनी केलेली भारतविरोधी वक्तव्ये निर्लज्ज, वर्णद्वेषी आणि खपवून न घेण्याजोगी होती. या मंत्र्यांनी व्यक्त केलेली मते मालदीवच्या सामान्य जनतेचे अजिबात प्रतिनिधित्व करत नाहीत. माझ्या मते मालदीवच्या सरकारने भारतीयांची अधिकृतरीत्या माफी मागणे गरजेचे आहे. आपण भारतावर किती अवलंबून आहोत आणि भारत आपल्या अडीनडीला कायम धावून येतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.’ मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहीम सोली यांनी समाजमाध्यमांवरील भारतविरोधी प्रतिक्रियांचा निषेध केला असून भारतासारख्या खात्रीशीर मित्राला दुखवता कामा नये, असे म्हटले आहे. मालदीवचे माजी उपाध्यक्ष अहमद अदीब यांनी म्हटले आहे की, आपण या प्रकरणी कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा असे काही घडणार नाही. मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शहीद यांनीदेखील भारतविरोधी वक्तव्यांचा निषेध केला. मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी यांनी म्हटले की, भारत आमचा घनिष्ठ मित्र आहे. ९११ क्रमांकावर फोन केल्यावर जशी आपल्याला खात्रीशीर मदत पोहोचते, अगदी तशाच प्रकारे भारत कायम आपल्या मदतीला धावला आहे. अशा मित्राबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली जाणे सर्वांसाठीच खेदजनक आहे.

लक्षद्वीपमध्ये नवीन विमानतळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीवरून मालदीवबरोबर राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच भारत लक्षद्वीपमध्ये नवीन विमानतळ विकसित करत असल्याची माहिती जाहीर झाली आहे. सध्या लक्षद्वीप बेटांमध्ये अगत्ती या ठिकाणी एकमेव विमानतळ असून त्यावर मर्यादित प्रकारची विमाने उतरू शकतात. आता भारत लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर मोठा विमानतळ बांधणार आहे. या संदर्भातील पहिली सूचना तटरक्षक दलाने केली होती. त्यानंतर या प्रस्तावावर वेगाने काम सुरू झाले आहे. नवीन वमानतळावर प्रवासी विमानांसह लढाऊ, टेहळणी आणि मालवाहू विमानेही उतरू शकणार आहेत. त्यामुळे अरबी समुद्र आणि हिंदी महासागर प्रदेशात गस्तीसाठी भारताला फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in