मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधातील वाॅरंटला स्थगिती, २७ मार्चला हजर राहण्याचे निर्देश

जामीनपात्र वॉरंटला स्थगिती देत साध्वी प्रज्ञासिंग यांना तात्पुरता दिलासा दिला. याचवेळी २७ मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधातील वाॅरंटला स्थगिती,  २७ मार्चला हजर राहण्याचे निर्देश
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला बुधवारी विशेष एनआयए न्यायालयाने स्थगिती दिली. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सुनावणीला हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. तथापि, साध्वी प्रज्ञासिंह यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी बुधवारी दिली. त्यामुळे न्यायालयाने वाॅरंटला स्थगिती दिली.

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी गेल्या आठवड्यात प्रज्ञासिंह यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले होते आणि सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र हे वाॅरंट अद्याप साध्वी प्रज्ञासिंह यांच्यापर्यत पोहोचलेले नाही. तसेच त्या सध्या रुग्णालयात दाखल असल्याचे वकिलांनी सांगितले. दोन्ही गोष्टींची दखल घेत विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी जामीनपात्र वॉरंटला स्थगिती देत साध्वी प्रज्ञासिंग यांना तात्पुरता दिलासा दिला. याचवेळी २७ मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in