मालीवाल हल्ला: विभवकुमारला चौकशीसाठी मुंबईत आणले

आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला केजरीवाल यांचा स्वीय सचिव विभवकुमार याला त्याच्या विशिष्ट आयफोनमधील माहिती मिळविण्यासाठी मुंबईत आणण्यात आले.
मालीवाल हल्ला: विभवकुमारला चौकशीसाठी मुंबईत आणले

नवी दिल्ली : आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला केजरीवाल यांचा स्वीय सचिव विभवकुमार याला त्याच्या विशिष्ट आयफोनमधील माहिती मिळविण्यासाठी मुंबईत आणण्यात आले.

मालीवाल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी विभवकुमार याला पाच दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभवकुमार याला अटक केल्यानंतर त्याचा भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आला, मात्र त्याची विशिष्ट प्रकारची रचना असल्याचे आढळून आले. त्याचा फोन फॉरमेट करण्यात आला असून त्यातील डेटा कुणाला तरी ट्रान्स्फर करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्या भ्रमणध्वनीतील माहिती मिळविण्यासाठी त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला करणारा विभवकुमार याच्यावर कारवाई करण्याऐवजी ‘आप’ मालीवाल यांचे चारित्र्यहनन करीत असल्याचा आरोप मंगळवारी भाजपने केला.

मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची कबुली ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत दिली असतानाही विभवकुमारवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

खासदार महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल संबंधितावर कडक कारवाई करण्याऐवजी आप त्या महिलेचे चारित्र्यहनन करीत आहे, असा आरोप त्रिवेदी यांनी केला. या प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला, त्याबद्दल त्रिवेदी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

याप्रकरणी कोणती चौकशी समिती आपण नेमली आहे का, जर चौकशी समितीच नेमली नसेल तर भाजपचा यामध्ये हात असल्याचा निष्कर्ष कसा काढण्यात आला, असा सवालही त्रिवेदी यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in