मोदींचे राजकीय पूर्वज ब्रिटिशांचे समर्थक! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

मोदी-शहांचे राजकीय आणि वैचारिक पूर्वज हे ब्रिटिश व मुस्लिम लीग समर्थक होते. आज त्यांचे वारसदार म्हणवणारे मोदी-शहा हे सामान्य भारतीयांच्या योगदानाने बनवलेल्या 'काँग्रेस न्याय पत्रा'च्या विरोधात मुस्लिम लीगचा ठसा असल्याचा खोटा प्रचार करत आहेत, असे खर्गे म्हणाले.
मोदींचे राजकीय पूर्वज ब्रिटिशांचे समर्थक! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

नवी दिल्ली : मोदी आणि शहा यांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिशांचे समर्थन केले होते. तसेच त्यांनी मुस्लिम लीगला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केल्याची जळजळीत टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. खर्गे यांनी सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

मोदी-शहांचे राजकीय आणि वैचारिक पूर्वज हे ब्रिटिश व मुस्लिम लीग समर्थक होते. आज त्यांचे वारसदार म्हणवणारे मोदी-शहा हे सामान्य भारतीयांच्या योगदानाने बनवलेल्या 'काँग्रेस न्याय पत्रा'च्या विरोधात मुस्लिम लीगचा ठसा असल्याचा खोटा प्रचार करत आहेत, असे खर्गे म्हणाले.

१९४२ मध्ये महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ चळवळीला आणि मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मोदी-शहा यांच्या पूर्वजांनी विरोध केला होता. त्यांच्या पूर्वजांनी १९४० मध्ये बंगाल, सिंधमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकारे स्थापन केली हे मोदी-शहा विसरले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तर तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरला पत्र लिहून काँग्रेसचे ‘भारत छोडो’ आंदोलन कसे दडपले जावे हे लिहिले होते आणि त्यासाठी ते इंग्रजांना साथ द्यायला तयार होते, असा टोला खर्गे यांनी लगावला.

काँग्रेस जाहीरनाम्याबाबत भाजपकडून चुकीचा प्रचार

आता मोदी-शहा आणि त्यांचे अध्यक्ष (जे. पी. नड्डा) काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल जनतेमध्ये चुकीचे समज पसरवत आहेत. भाजपला ही निवडणूक दिवसेंदिवस जड जाणार असल्याचे लक्षात आले आहे आणि त्यामुळेच त्यांना आपला जुना मित्र मुस्लिम लीग आठवू लागला आहे, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in