कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिलीगुडी येथे १६ जानेवारी २०२६ रोजी महाकाल महातीर्थ मंदिराचे भूमिपूजन केले. हे मंदिर १७ एकर जागेत उभारले जाणार असून जगातील सर्वात भव्य अशा शिव मंदिरांपैकी ते एक असेल. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे डिसेंबर २०२५मध्ये, दुर्गा अंगणचे भूमिपूजन केले होते. त्यापूर्वी सुमारे ६ महिन्यांपूर्वी, दीघा येथे पुरीच्या धर्तीवर जगन्नाथ धाम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली होती. पश्चिम बंगालच्या इतिहासात हे पहिले मंदिर आहे, ज्याची प्राणप्रतिष्ठा कोणा मुख्यमंत्र्याने केली आहे. ममतांच्या या मंदिरांच्या निर्मितीवर आता भाजपने टीकेची झोड उठवली आहे. आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जींना आपली खुर्ची जाण्याची भीती आहे, म्हणूनच त्या मंदिरे बांधत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.
मंदिरही मिळाले, रोजगारही मिळाला...
ममता यांनी ज्या भागांत मंदिरे बांधली तेथील स्थानिक व्यवसायांमध्ये वाढ झाली असल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच सरकारलाही १०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मात्र, भाजप याला निवडणुकीतील लांगूलचालन म्हणत आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत ममतांच्या मंदिर राजकारणामुळे काय बदल घडण्याची शक्यता आहे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ममतांच्या कृतीवर भाजपने टीका केली असली तरी सामान्य लोकांच्या मते त्यांना मंदिरही मिळाले आणि रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. दीघा येथील मंदिराबाहेर वस्तू विकणाऱ्या काही महिलांशक्ष चर्चा केली त्यावेळी त्यापैकी एक सुमित्रा या शंख विकतात. त्यांनी सांगितले, ‘हे मंदिर पर्यटन स्थळावर बांधले आहे. दीघा येथे वर्षभर लोक फिरायला येतात. हे मंदिर बांधल्यामुळे माझ्यासारख्या महिलांना रोजगार मिळाला आहे. मी सकाळ-संध्याकाळ दोन वेळा येते आणि वस्तू विकून घरी जाते’, तर येथेच भेटलेले पारस रुइदास म्हणाले, ‘ममता बॅनर्जींनी सामान्य लोकांसाठी मंदिर बांधले आहे. लोक दीघा फिरायला येतात, तेव्हा मंदिरालाही भेट देतात. त्यांना निवडणुकीबाबत विचारल्यावर राज्यात ‘सरकार तर तृणमूल काँग्रेसचेच येईल असे ठाम मत ते मांडतात.
लोकांना हवीय भाकरी, कपडा, घर
मात्र, ममतांच्या या मंदिर राजकारणावर संजय शर्मा यांनी वेगळे मत मांडले आहे. ते म्हणाले, ‘राज्यात लोकांना रोजगार नाही. मग मंदिर-मस्जिद बांधून काय होणार? लोकांना भाकरी, कपडा आणि घर पाहिजे. वस्तू आणि पैसे वाटून काही होणार नाही. इथे काम मिळणे बंद झाले आहे, कोणी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही’. तसेच ‘भाजप आणि टीएमसी हा दोन्ही पक्ष सारखेच आहेत. यांच्या मंदिर-मस्जिदच्या राजकारणाने काहीही होणार नाही, अशी संतप्त भावना संजय यांनी व्यक्त केली. तर, सुगतो मंडल म्हणतात, ‘मंदिर बांधल्याने व्यवसाय वाढला आहे. स्थानिक लोकांनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत.’ ममतांनी प्राणप्रतिष्ठा केल्यावर भाजपने केलेल्या विरोधाबद्दल सुगतो म्हणतात, ‘हे भाजपचे उत्तर प्रदेश नाही, जिथे महिलांना घराच्या चार भिंतीत ठेवले जाते. इथल्या महिला मजबूत आहेत. जर दीदी पूजा करत असतील, तर त्याला विरोध का?’
हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्याचा ममतांचा प्रयत्न
ममता यांची हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमध्ये मंदिर राजकारण हे फार जुने नाही. हे नुकतेच काही वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर नेगर यांनी सांगितले की, ‘ममता बॅनर्जी यांच्यावर नेहमीच मुस्लिमधार्जिण्या असल्याचा आरोप होत आला आहे. या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतला आहे. मुस्लिमबहुल भाग वगळल्यास, हिंदूंनी दिलेली मतेच ठरवतात की सत्ता कोणाला मिळणार आहे.’ ‘ममता बॅनर्जींनी केवळ तीन मंदिरांचेच भूमिपूजन केले नाही, तर गंगासागरमध्ये स्नान करणाऱ्यांना नदीवर पुलाची भेटही दिली आहे. त्यांनीच पहिल्यांदा दुर्गापूजा कार्निव्हल आयोजित केला.’
भाजपकडून भगवान नारायणाचा अपमान?
तर टीएमसीने, ‘राजकारण करताना भाजप भगवान नारायणाचा अपमान करत आहे, असे मत टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजु दत्ता यांनी व्यक्त केले. भाजपवर पलटवार करताना ते म्हणाले, ‘जर दीदी मंदिराचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा करू शकत नाहीत, तर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील अपूर्ण राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा कशी केली? कारण स्पष्ट होते, लोकसभा निवडणुका. जगन्नाथ धामची प्राणप्रतिष्ठा एप्रिल २०२५ मध्ये झाली, त्यावेळी बंगालमध्ये कोणतीही निवडणूक नव्हती.