
पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी द्यावयास हवी, असे राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी येथे सांगितले. संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी ममतांनी अलीकडेच दर्शविली होती.
विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व ममतांनी करण्यात काँग्रेसला काही अडचण असेल तर त्याने काहीच फरक पडत नाही. ममतांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करू द्यावे, असे यादव म्हणाले. त्यापूर्वी लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही ममतांनी नेतृत्व करण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. इंडिया आघाडीतील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने नेतृत्व करण्यास काहीच हरकत नाही, मात्र त्याबाबतचा निर्णय एकमताने व्हावयास हवा, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद आणि इंडिया आघाडीचे नेतृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या आपण पार पाडू शकतो, असे ममतांनी स्पष्ट केले होते.