कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नावे वगळल्याबद्दल भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. मतदारयादीतून मतदारांची नावे काढण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपला पक्ष पुन्हा न्यायालयात जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीतून सुमारे ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
केवळ नावे वगळून तुम्ही तृणमूल काँग्रेसचा पराभव करू शकणार नाही. असे बॅनर्जी यांनी भाजपला बजावले.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये असलेल्या ७.६६ कोटींच्या मूळ मतदार संख्येमधून तब्बल ९०.८३ लाख नावे वगळण्यात आली आहेत.
हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथील प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मतदार यादीत फेरफार करण्याचा आणि मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप केला. तसेच, निवडणूक आयोग भाजपच्या सांगण्यावरून काम करत असून फोनवरून लोकांना धमकावत असल्याचा दावाही त्यांनी केला.
बालागड येथील सभेत बोलताना त्यांनी इशारा दिला की, ‘‘मतदान करणे म्हणजे मासे, मांस आणि बंगाली भाषेचा त्याग करण्यासारखे आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र यांसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये लोकांना अंडी, मासे किंवा मांस खाण्याची परवानगी नाही. भाजप सत्तेत आल्यास बंगालमध्येही हेच होईल.’’ श्रीरामपूर येथील सभेत त्यांनी आरोप केला की, भाजप ‘मतदारसंघ पुनर्रचना’ करण्याच्या नावाखाली बंगालची फाळणी करण्याचा आणि राज्यातून दुसरे राज्य निर्माण करण्याचा कट रचत आहे.
काय म्हणाल्या ममता
"घटनेनुसार मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी आम्ही कायदेशीर लढा देऊ. जर लोक मतदानच करू शकणार नसतील, तर अशा लवादाची काय गरज? आणि मग तुम्ही म्हणताय की यादी गोठवण्यात आली आहे. हे काय आहे? आम्ही याला आव्हान देऊ आणि हे नेमके काय चालले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू."