
ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली राजकीय होळी खेळली जात असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव राजकीय आकर्षण मिळवण्यासाठी जाणूनबुजून देण्यात आले आहे. जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात आणि देशाच्या हितासाठी परदेशात पोहोचतात तेव्हा केंद्र सरकार राजकीय होळी खेळत आहे, अशी टीका ममतांनी केंद्र सरकार आणि मोदी यांच्यावर केली.
आमचे ऑपरेशन सिंदूरला समर्थन आहे, पण पंतप्रधान मोदी देशभरात सभा घेण्यात व्यस्त आहेत, असेही बॅनर्जी म्हणाल्या. मी त्यांना उघड आव्हान देते की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करावी, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. पंतप्रधान जे बोलत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. जर विरोधी पक्ष परदेशात जात असेल तर ते देशाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि लोकशाहीचा आवाज उठवण्यासाठी जात आहेत, देशाची बदनामी करण्यासाठी नाही.
मोदींना लाइव्ह चर्चेचे आव्हान
मोदींवर ऑपरेशन सिंदूरवरून आरोप करत ममता यांनी सवाल उपस्थित केले. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार कुठे आहेत, त्यांना पकडले गेले का, तर नाही, पण तुम्ही बंगालची बदनामी करत आहात. आज जेव्हा आमच्या पक्षाचे खासदार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे रक्षण करत आहेत, तेव्हा पंतप्रधान आमच्या राज्याची बदनामी करण्यासाठी बंगालमध्ये येतात, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना थेट चर्चेसाठी आव्हान दिले आणि म्हणाल्या की जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत लाइव्ह टीव्ही चर्चेत बसा. तुम्हाला हवे असेल तर टेलीप्रॉम्प्टर घेऊन या.