
प्रयागराज : अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर वाद निर्माण झाल्याने ममताने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. ममताला ही पदवी दिल्याने अनेक साधू, महंत नाराज झाले होते. आता ममताने व्हिडीओ शेअर करत राजीनाम्याची माहिती दिली आहे. ममता कुलकर्णीने याबाबत व्हिडीओ शेअर करीत म्हटले आहे की, मी महामंडलेश्वर, यमाई ममता नंदगिरी या पदाचा राजीनामा देत आहे.
आज किन्नर आखाड्यात आणि इतरांमध्ये मला महामंडलेश्वर उपाधी देण्यावरून वाद होत आहे. मी एक साध्वी होते आणि साध्वीच राहीन. महामंडलेश्वर हा सन्मान मला मिळाला होता. तो त्यांना मिळतो ज्याने तपस्या केली असते. मी तपस्या केली, बॉलिवूड, ग्लॅमर सगळे सोडले. पण तरी काहींना माझ्या या पदावरून आपत्ती आहे. म्हणून मी हे पद सोडत आहे. महामंडलेश्वर होणे म्हणजे इतरांना आपल्याकडील ज्ञान देणे असून ते मी करतच राहीन, असे ममताने म्हटले आहे.
ममता कुलकर्णी काही वर्षांपूर्वी २ हजार कोटी किमतीच्या अमली पदार्थ प्रकरणात अडकली होती. तिच्याविरोधात अटकेचे वॉरंटही होते, मात्र ती भारताबाहेर गेली. विकी गोस्वामी हा या प्रकरणाचा सूत्रधार होता. ममताने विकीशी लग्नही केले, अशीही चर्चा होती. गेल्या वर्षीच पुराव्यांअभावी ममताला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले. यानंतर ती आता भारतात परतली आहे.