

बोंगाव : जर भाजपने बंगालमध्ये आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण भारतात भाजपचा पाया हादरवून टाकू, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजपला दिला. भाजप आम्हाला राजकीयदृष्ट्या पराभूत करू शकत नाही, भाजपशासित राज्यांमध्ये ‘एसआयआर’ लागू करण्याचा अर्थ केंद्र सरकारने तेथे घुसखोरांची उपस्थिती मान्य केली आहे का, असा सवाल त्यांनी केला.पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी बॅनर्जी यांनी ‘एसआयआर’विरुद्ध रॅलीच काढली नाही तर भाजपला खुले आव्हानही दिले. माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपचा पाया हादरवून टाकेन, असा इशारा त्यांनी दिला. ममता म्हणाल्या की, ‘एसआयआर’नंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि भाजपने काय केले आहे हे लोकांना कळेल. जर ‘एसआयआर’ दोन ते तीन वर्षांत झाला तर आम्ही शक्य तितक्या सर्व साधनांनी प्रक्रियेला पाठिंबा देऊ. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण भारतात त्यांचा पाया उखडून टाकेन, असे त्या म्हणाल्या.
रोहिंग्या किंवा इतर घुसखोर भारतात येत असतील, तर मग सीमांची जबाबदारी कोणाची? बॉर्डर मॅनेजमेंट केंद्र सरकार करते. सीआयएसएफ विमानतळ सांभाळते. कस्टम्स केंद्राच्या अखत्यारीत आहे. नेपाळ सीमा कोण सांभाळतो? सीमांची जबाबदारी राज्यावर ढकलून बंगालला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगाल ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात बीजेपी येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पराभूत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
...तर केंद्र सरकारही काढून टाकले जाईल
मला बांगलादेश एक देश म्हणून आवडतो कारण आमची भाषा एकच आहे. मी बीरभूमची आहे; एक दिवस ते मला बांगलादेशी म्हणतील. काळजी करू नका, पंतप्रधान मोदींना २०२४ च्या यादीत मतदान झाले आहे. जर तुमचे नाव काढून टाकले तर केंद्र सरकारही काढून टाकले जाईल. मला विचारायचे आहे की, ‘एसआयआर’बद्दल इतकी घाई का आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.