
महाकुंभनगर : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी आता महाकुंभमेळ्यात दाखल झाली आहे. ममता आता घरगुती जीवनातून निवृत्त होऊन संताचे जीवन जगणार आहे. तिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर करण्यात आले आहे.
ममता कुलकर्णी शुक्रवारी किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर झाली असून, तिने शुक्रवारी संन्यास जीवनाचा स्वीकार केला. तिचा पट्टाभिषेक शुक्रवारी किन्नर आखाड्यात पार पडला. ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी महाराज आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांची भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यापासून अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यात कशी सहभागी होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
प्रयागराजच्या महाकुंभात किन्नर आखाडाही पोहोचला आहे. याच शतकात २०१५ मध्ये उज्जैनमध्ये या आखाड्याची स्थापना झाली. किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर कौशल्या नंदगिरी 'टीना मा' यांनी किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर कसा बनवला जातो आणि त्याचे नियम काय आहेत हे सांगितले. कौशल्या नंदगिरी यांच्या म्हणण्यानुसार, किन्नर आखाडादेखील इतर आखाड्यांप्रमाणेच चालतो. संन्यास वगैरे देण्याची प्रक्रियाही तशीच आहे. महामंडलेश्वर किंवा इतर पदव्या घेणाऱ्या लोकांचे आचरण आणि विचार यांचे परीक्षण केले जाते. याशिवाय तो देशभक्त आहे की नाही हेही आम्ही पाहतो. एखाद्याला संन्यास घेण्यापूर्वी हे तपासून पाहणे आवश्यक आहे.
ममता आता झाली 'श्री यामिनी ममता नंद गिरी'
किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी यांनी सांगितले की, ममता गेल्या दोन वर्षांपासून सनातन धर्मात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत होती. पूर्वी ती जुना आखाड्यात शिष्य होती आणि नंतर किन्नर आखाड्याच्या संपर्कात आली. तिने आखाड्यात महामंडलेश्वर बनण्याची मागणी केली होती. त्यानंतर तिला त्याची प्रक्रिया आणि जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या. ममता कुलकर्णीचे नाव आता बदलून 'श्री यामिनी ममता नंद गिरी' करण्यात आले आहे. किन्नर आखाड्याच्या परंपरेचा भाग असलेल्या ममताचे चुडाकर्म (वेणी कापणे) आणि पिंड दान केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.