

फरीदाबाद: पार्किंगच्या क्षुल्लक वादातून येथील सेक्टर २१सी मध्ये एका ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच शेजाऱ्याने परवानाधारक पिस्तूलने गोळ्या झाडून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परमजीत धनखड असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सिंगापूरमधील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर २१सी मधील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर परमजीत धनखड यांचे कुटुंब राहते, तर आरोपी सोनू शर्मा ऊर्फ मोह तिसऱ्या मजल्यावर राहतो. पार्किंगच्या जागेत घाण केल्यावरून तसेच वाहने पार्क करण्यावरू दोन कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
शुक्रवारी रात्री परमजीत हे जिममधून परतल्यानंतर त्यांनी शर्माला आपली कार पार्किंगच्या जागेवरून हटवण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या शर्माने आपल्या परवानाधारक पिस्तूलमधून परमजीत यांच्यावर सुमारे १५ राऊंड झाडले, ज्यापैकी ९ गोळ्या परमजीत यांना लागल्या. गंभीर जखमी झालेल्या परमजीत यांचा जागीच मृत्यू झाला. परमजीत हे सिंगापूरमध्ये नोकरीला होते आणि कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ५ नोव्हेंबर रोजीच भारतात आले होते. तसेच २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या भाच्याचे लग्न असल्याने ते सुट्टीवर आले होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर आरोपी सोनू शर्मा आपल्या कुटुंबासह फरार झाला होता, परमजीत यांच्या मुलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सूरजकुंड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काडतुसांचे खोके जप्त केले.